
पृथ्वी हळूहळू अभूतपूर्व अशा जीवघेण्या उष्णतेच्या सापळ्यात अडकत आहे. क्लायमेट इम्पॅक्ट लॅबने या संकटाबद्दल एक धक्कादायक माहिती प्रसिद्ध केली आहे. पॅसिफिक महासागरातील प्रचंड एल निनो हवामान बदलामुळे येत्या काही महिन्यांत जग एका धगधगत्या भट्टीत बदलेल. या अभ्यासानुसार, केवळ सप्टेंबर 2026 ते फेब्रुवारी 2027 या काळात प्रचंड उष्णतेमुळे अंदाजे 4,51,000 वर लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जागतिक स्तरावरील उष्णतेच्या धोक्यामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी बहुतांश मृत्यू ग्लोबल साउथमध्ये होण्याची दाट शक्यता आहे. हवामान बदल आणि तीव्र हवामानाचा मानवी जीवनावर आणि अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणाऱ्या क्लायमेट इम्पॅक्ट लॅब या संशोधन संस्थेने हा इशारा दिला आहे.
1996 ते 2025 हा आधारभूत कालावधी गृहीत धरून, सरासरी वर्षात होणाऱ्या मृत्यूंच्या तुलनेत या काळात उष्णतेमुळे वाढणाऱ्या अतिरिक्त मृत्यूंची ही आकडेवारी आहे. या अंदाजानुसार, आग्नेय आशियातील फिलीपिन्स, व्हिएतनाम, थायलंड आणि कंबोडियामध्ये मिळून 19 हजार 400 अतिरिक्त मृत्यू होऊ शकतात, तर इंडोनेशियामध्ये 19 हजार 300 मृत्यू नोंदवले जाण्याचा अंदाज आहे. याशिवाय ब्राझीलमध्ये हा आकडा 13 हजार 300 असून हिंदुस्थानसाठी हा अंदाज 15 हजार 800 इतका वर्तवण्यात आला आहे. सरकारोंना उष्णतेच्या तीव्र लाटांचा सामना करण्यासाठी शीतकरण केंद्रे, पाणी पिण्याच्या सुविधा, बाहेरील कामगारांचे संरक्षण आणि आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासारख्या उपाययोजना वेळेत करता याव्यात, यासाठी हा अंदाज उपयुक्त ठरेल, असे लॅबने स्पष्ट केले आहे. जागतिक हवामान संघटनेने (WMO) 3 सप्टेंबर रोजी जाहीर केले होते की, एल निनोची स्थिती अधिक तीव्र होत असून नोव्हेंबर ते डिसेंबरदरम्यान ती टोकाला पोहोचेल. फेब्रुवारी 2027 पर्यंत ही स्थिती टिकून राहण्याची शक्यता जवळपास शंभर टक्के आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय सागरी आणि वातावरणीय प्रशासनाच्या (नोआ) मूल्यांकनानुसार, पॅसिफिक प्रदेशात समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यपेक्षा बरेच जास्त नोंदवले गेले असून, उत्तर गोलार्धातील शरद व हिवाळ्यात अत्यंत तीव्र एल निनोची शक्यता नव्वद टक्क्यांहून अधिक आहे.
फेब्रुवारी 2027 च्या या सहा महिन्यांच्या कालावधीनंतरही हिंदुस्थान आणि पाकिस्तानसारख्या प्रमुख भागांमध्ये उन्हाळ्यात उष्णतेमुळे होणाऱ्या मृत्यूंची वाढ सुरूच राहील, असा इशारा लेखकांनी दिला आहे. दरम्यान, एल निनोच्या परिणामांची चिन्हे आधीच दिसू लागली असून, मागील ऑगस्ट महिना हा आतापर्यंतचा सर्वात उष्ण ऑगस्ट ठरला आहे. जागतिक सरासरी हवेचे तापमान 16.96 अंश सेल्सिअस नोंदवले गेले असून, पूर्व-औद्योगिक काळातील सरासरीपेक्षा ते 1.65 अंश सेल्सिअसने जास्त होते. ही विक्रमी उष्णता म्हणजे दीर्घकालीन तापमानवाढ आणि एल निनोचे एकत्रित प्रतिबिंब आहे.

























































