
केंद्रीय निवडणूक आयोगातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अनेक निर्णयांवर त्यांच्या सहकाऱ्यांनी आक्षेप घेतल्याने राजकारणात तापले आहे. विरोधकांकडून टीकेची झोड उठली असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर आणि केंद्र सरकारच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. निवडणूक आयोगातील अंतर्गत वादाच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
रोहित पवार यांनी X वर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये ते म्हणाले की, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या मनमानी कारभाराविरोधात आवाज उठवल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले असून, यावरून निवडणूक आयोगाची विश्वासार्हता रसातळाला गेल्याचे स्पष्ट होते, असे रोहित पवार म्हणाले. देशाचा प्रवास रशियाच्या दिशेने सुरू असून भाजपच्या काही नेत्यांना पुतीन बनण्याची घाई झाली असल्याचा टोला त्यांनी लगावला. यामुळंच देशातील 100 कोटी मतदारांचा विश्वास धुळीस मिळवला जातोय, असे ते म्हणाले.
निवडणूक आयोगावरील सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी या दोन निवडणूक आयुक्तांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या मनमानी कारभाराविरोधात आवाज उठवल्याचं लोकसत्तेत प्रसिद्ध झालेलं वृत्त हे निवडणूक आयोगाची विश्वासार्हता रसातळाला गेली यावर शिक्कामोर्तब करणारं आहे. देशाचा प्रवास… pic.twitter.com/CSIejfMgHE
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 23, 2026
2014 नंतर निवडणूक आयोगाची पूर्णपणे वाताहत झाली असून याला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पश्चिम बंगालमध्ये SIR च्या माध्यमातून लाखो मतदार वगळून भाजपने निवडणुका जिंकल्याचा आरोप करून महाराष्ट्रातही असाच प्रकार सुरू असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश यांच्या समितीने निवडणूक आयुक्तांची नेमणूक करणे अपेक्षित होते. मात्र, भाजप सरकारने संसदेत कायदा करून सरन्यायाधीशांना वगळले आणि त्याऐवजी केंद्रीय मंत्र्याचा समावेश केला. पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्री यांना बहुमताने आपल्या तालावर नाचणाऱ्या व्यक्तीला या महत्त्वाच्या पदावर बसवता यावं यासाठीच हा कायदा केला गेला आणि त्याचे भयानक परिणाम आज देशाला आणि लोकशाहीला भोगावे लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या पार्श्वभूमीवर, मनमानी करणारे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना तातडीने या पदावरून हटवावे आणि निवड समितीतील केंद्रीय मंत्र्याला वगळून त्याजागी पुन्हा निःस्पृह न्यायाधीशांचा समावेश करावा, अशी ठाम मागणी रोहित पवारांनी केली आहे. तरच भविष्यात लोकशाही जिवंत राहील, अन्यथा भाजपच्या हातातले बाहुले बनलेल्या आयुक्तांकडून लोकशाहीचा खून होत राहिल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
ज्ञानेश कुमार यांना हटवा, तुरुंगात पाठवा, उद्धव ठाकरे यांची मागणी




























































