
ज्ञानेश कुमार यांना तत्काळ पदावरून हटवलं पाहिजे. कारण ते देशाची वाट लावत आहेत. आमच्यावरती ज्यांनी आरोप केले की, पक्षप्रमुख मनमानी करत होते तर हे निवडणूक आयुक्त मनमानी करताहेत. आणि त्याच्याबद्दल दुसऱ्या दोन निवडणूक आयुक्तांनी कॅबिनेट सचिवांकडे तक्रार केलीय. म्हणजे देशाच्या पंतप्रधानांकडे तक्रार केलीय. आता देशाच्या पंतप्रधानांची जबाबदारी आहे की, ताबडतोब ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा नाही तर यांची हकालपट्टी करून तुरुंगात टाकलं पाहिजे, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोग आणि केंद्र सरकावर हल्ला चढवला.
आम्ही सर्व विरोधी पक्ष सातत्याने निवडणूक आयोगाच्या विशेषतः निवडणूक आयुक्तांच्या मनमानी आणि विचित्र कारभाराबद्दल सातत्याने बोलत आहोत. आणि त्याला आज पुष्टी मिळालेली आहे. दोन निवडणूक आयुक्त जे आहेत, ज्याला खरं बंड म्हणतात आणि आता निवडणूक आयोग हा आता दोन आयुक्तांचा झाला आहे. ज्ञानेश कुमारना यांनी निवडणूक आयोगातून काढलेलं आहे, असं आपण समजायला हरकत नाही. कारण आता यांच्याकडे मेजॉरिटी झालेली आहे. पक्षांतर्गत लोकशाही, देशांतर्गत लोकशाही, पक्षामध्ये मनमानी चाललेली आहे, पक्षप्रमुखांची मनमानी चाललेली आहे, असे आक्षपे घेऊन ही एक टोळी गेली काही वर्षे आपल्या देशामध्ये हैदोस घातले आहे. तिचं बिंग आज फुटलेलं आहे. आणि या दोन निवडणूक आयुक्तांना मी खास देशाच्या जनतेतर्फे धन्यवाद देतोय की आपण ही हिंमत दाखवली. आणि ज्ञानेश कुमारांचा विद्रुप, भीषण, बीभत्स चेहरा हा जगसमोर आणलेला आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
आपला देश ही जगातील सगळ्यात मोठी लोकशाही मानली जाते. आणि याच देशामध्ये एक टोळी गेली काही वर्षे हैदोस घालतेय. त्याच्यामध्ये पक्ष फोडणे, पक्ष चोरणे, लोकशाहीचा खून करणे अशी ही टोळी कारभार करते. आणि त्याचा मुख्य सूत्रधार हा ज्ञानेश कुमार आहे. त्याच्यामुळे या ज्ञानेश कुमारना तातडीने तुरुंगात टाकून या टोळीचा मुख्य जो म्होरक्या आहे. आता ही टोळी कोणाच्या इशाऱ्यावरती काम करत होती? हे सुद्धा आता लोकांना कळलेलं आहे. निवडणूक आयोग गृह खात्याच्या सूचना मानतो असं म्हणतात. म्हणजेच गृहमंत्री याचे सूत्रधार आहेत का? याचाही खुलासा झाला पाहिजे. आणि असेल तर त्यांना सुद्धा योग्य ती सजा दिली गेली पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
एकूणच ही एक आता पद्धत झालेली आहे. यांच्या चोरीची आणि लोकशाहीच्या खुनाची ही यांनी पद्धत ठरवलेली आहे. त्याचा पहिला आघात हा त्यांनी आमच्या शिवसेनेवर केला. शिवसेनेचं नाव हे पहिल्या पोटनिवडणुकीसाठी गोठवण्यात आलं होतं. आम्हाला दोन वेगवेगळ्या नावाने निवडणूक लढण्याची आणि दोन निवडणूक चिन्ह आणि निवडणूक लढण्याची परवानगी दिली होती. त्यांच्यानंतर निवडणूक आयुक्तांनी एक फार्स केला. जो आता उघड झाला आहे. काही परिमाणं जी त्यांनी तपासायला पाहिजे होती ती न तपासता त्यांनी एकतर्फी निर्णय दिला. आणि शिवसेना हे नाव आणि चिन्ह गद्दारांना दिलं. तीच पद्धत त्यांनी पवारसाहेबांच्याबद्दल वापरली. नाव आणि चिन्ह काही काळ गोठवलं आणि तसंच्या तसं हे त्यांच्या गद्दारांना दिलं. तिच पद्धत आता तृणमूल काँग्रेसच्या बाबतीत ते अवलंबताहेत ते अर्ध्या वाटेत आहेत. पोटनिवडणुकीसाठी तुला नाही मला नाही असं करून नंतर ते तृणमूलचं सुद्धा नाव आणि चिन्ह हे त्यांच्या गद्दारांना देणार हा आतापर्यंतचा त्यांचा हा प्रघात त्यांनी ठरवून टाकलेला आहे. याचाच अर्थ असा की हा लोकशाहीचा खून केला जातोय, असा हल्ला उद्धव ठाकरे यांनी चढवला.
आम्ही सातत्याने निवडणूक आयोगाच्या गैरकारभाराबद्दल आवाज उठवला. गेल्या निवडणुकीत लोकसभेमध्ये महाराष्ट्रमध्ये महाविकस आघाडीला चांगलं यश मिळालं. त्याच्यानंतर सहा महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत जळपास ४५ लाख मतदार यादीत घुसवले गेले. आणि आता जवळपास ४० लाख त्याच मतदारांवरती निवडणूक आयोगाने एसआयआरच्या माध्यमातून आक्षेप नोंदवला आहे. आता लालकृष्ण अडवाणींचं नाव नाही. म्हणजे ज्यांच्यामुळे हे सत्तेची गादी भोगताहेत त्यांचच नाव त्या यादीतून वगळलं आहे. बऱ्याच गोष्टी यांनी केलेल्या आहेत. याचा अर्थ असा की, केवळ सत्तेची हवस आणि त्याच्या पायी लोकशाहीचा खून आम्ही म्हणून ज्ञानेश कुमारना तातडीने तुरुंगात टाकलं पाहिजे. निवडणूक आयोग हा या दोघांच्या मालकीचा आहे, त्या दोघांनी आता राज्य केलं पाहिजे. निवडणूक आयोगाचे सगळे चुकीचे निर्णय हे रद्द केले पाहिजेत. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्राची विधानसभा, पश्चिम बंगालची विधानसभा, तामिळनाडूची असेल, ज्या-ज्या निवडणुकांमध्ये या ज्ञानेश कुमारनी अकलेचे दिवे नसलेले अकलेचे दिवे लावलेत आणि त्यांना हवे ते मतदार त्याच्यात ठेवलेत, नको ते मतदार त्यातून काढलेत. या निवडणुका रद्द करून तिन्ही राज्यांच्या फेरनिवडणुका घेतल्या पाहिजेत. आणि त्या देखील बॅलेट पेपवर घेतल्या गेल्या पाहिजेत. आणि हा निर्णय जर का घेतला नाही तर देशाचे डोळे उघडलेले आहेत. आणि आता जर यांच्यावरती कारवाई केली गेली नाही तर जनता मात्र यांचा हिशेब चुकता केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
सर्व विरोधी पक्षांना विनंती आहे की, आपण सगळे एकत्र येऊन देशातली लोकशाही वाचवली पाहिजे. शेवटी निवडणूक आणि लोकशाही याचा अर्थ तोच असतो की जे जनता म्हणेल ते आपण मान्य केलं पाहिजे. आणि ते मान्य होणार नसेल तर जनतेला आता नाईलाजाने कॉक्रोच जनता पार्टी ही जशी रस्त्यावरती उतरली, त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला तशा पद्धतीने जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा गर्भित इशारा उद्धव ठाकरे यांनी पुन्हा निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला दिला.




























































