दिल्लीतून मान्सूनची लवकर एक्झिट; 2002 नंतरचा सर्वात वेगवान परतीचा प्रवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
rain-in-delhi
फाईल फोटो

राजधानी दिल्लीतून नैऋत्य मोसमी पावसाने म्हणजेच मान्सूनने बुधवार, २३ सप्टेंबर रोजी अधिकृतपणे एक्झिट घेतल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने (IMD) दिली आहे. २००२ नंतर पहिल्यांदाच मान्सून इतक्या लवकर दिल्लीतून माघारी परतला आहे. यापूर्वी २००२ मध्ये मान्सून २० सप्टेंबर रोजी दिल्लीतून परतला होता.

दिल्लीसह पंजाब, हरियाणा आणि राजस्थानच्या बहुतांश भागांतून, तसेच उत्तर प्रदेश आणि गुजरातच्या काही भागातूनही मान्सून माघारी फिरला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून सध्या गुरदासपूर, चंदीगड, मुझफ्फरनगर, अलीगड, धोलपूर, उदयपूर, डीसा आणि नलिया या भागातून जात आहे. मान्सून पुढे सरकल्याने दिल्लीसह उत्तर-पश्चिम भारतात आता कोरडे हवामान निर्माण होण्याचा अंदाज आहे.

मान्सूनची एक्झिट कशी ठरवली जाते?

मान्सूनची एक्झिट जाहीर झाली म्हणजे पाऊस पूर्णपणे थांबला असा होत नाही. पावसातील सातत्यपूर्ण खंड, हवेतील आर्द्रतेच्या प्रमाणात झालेली घट आणि खालच्या वातावरणात अँटी-सायक्लॉनिक (प्रतिचक्रवात) प्रणालीची निर्मिती यांसारख्या अनेक घटकांचा अभ्यास करून हवामान विभाग अधिकृत परतीचा प्रवास जाहीर करतो.

साधारणपणे, उत्तर-पश्चिम भारतातून मान्सूनची माघार १७ सप्टेंबरच्या सुमारास सुरू होते आणि १५ ऑक्टोबरपर्यंत देशाच्या बहुतांश भागांतून पाऊस निरोप घेतो; तर दक्षिण द्वीपकल्पातून परतण्यासाठी मान्सूनला आणखी वेळ लागतो.

गेल्या काही वर्षांतील परतीचा प्रवास

दिल्लीतून मान्सूनच्या परतीच्या तारखांमध्ये दरवर्षी मोठा बदल पाहायला मिळतो. २००२ मध्ये २० सप्टेंबरला मान्सून परतला होता, तर त्यानंतर अनेक वर्षांत त्याने थेट ऑक्टोबरपर्यंत मुक्काम वाढवला होता. २०१३ मध्ये १७ ऑक्टोबर, २०१६ मध्ये ८ ऑक्टोबर, तर २०२४ मध्ये २ ऑक्टोबर रोजी दिल्लीतून मान्सूनची अधिकृत माघार नोंदवली गेली होती.