
छत्तीसगडमधील बस्तरच्या जंगलात नक्षलवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा सुरक्षा दलांनी शोधून काढला असून त्यात चिनी बनावटीचे हातगोळे आढळल्याने तपास यंत्रणांचे लक्ष या स्फोटकांच्या स्रोताकडे वळले आहे. बिजापूर जिह्यातील लंका पहाडी परिसरात शोधमोहीम सुरू असताना हा साठा आढळून आला.
सुरक्षा दलाच्या भूसुरुंग शोधमोहिमे दरम्यान हा शस्त्रसाठा आढळला. यात एक रायफल, एक इन्सास रायफल, बंदूक, दोन ग्रेनेड फेकणारी शस्त्रे, मोठ्या प्रमाणात काडतुसे आणि हातगोळे आढळले. याशिवाय विविध मॅगझीन आणि ग्रेनेडचे स्फोटक भागही जप्त करण्यात आले आहेत. या शस्त्रसाठ्यातील चिनी बनावटीचे हातगोळे तपासाचा प्रमुख मुद्दा ठरला आहे. हे हातगोळे नक्षलवाद्यांपर्यंत नेमके कसे पोहोचले, ते कधी जंगलात आणण्यात आले आणि त्यांचा यापूर्वी कोणत्या कारवायांमध्ये वापर झाला आहे का, याचा तपास केला जात आहे.




























































