
ग्रामीण जनतेला शासकीय सुविधा सहज मिळाव्यात तसेच प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान व्हावे यासाठी राज्यात 47 नवीन अतिरिक्त तहसीलदार कार्यालये सुरू होणार आहेत. याशिवाय 4 नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयेही स्थापन करण्यात येणार आहेत.
प्रशासकीय विपेंद्रीकरणाला गती देण्यासाठी चार प्रमुख जिह्यांमध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्यात आली आहेत. पुणे जिल्ह्यातील बारामती, सोलापूर जिह्यातील पंढरपूर, रत्नागिरी जिह्यातील दापोली आणि नागपूर (ग्रामीण) येथे नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयांची निर्मिती करण्याचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे.
शासकीय कार्यालयांमधील कामकाजाचा वाढता व्याप, उपलब्ध अपुरा अधिकारी आणि कर्मचारीवृंद, तालुक्यांचे तसेच जिह्यांचे भौगोलिक अंतर, वाढती लोकसंख्या आणि वेगाने होणारे नागरीकरण विचारात घेऊन प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईत चेंबूर, मालाड, वांद्रे येथे अतिरिक्त तहसील
मुंबई उपनगर जिल्ह्यात कुर्ला, बोरीवली आणि अंधेरी तालुक्यातील अनुक्रमे चेंबूर, मालाड आणि वांद्रे येथे, तर नाशिक जिह्यात बागलाण तालुक्यातील नामपूर येथे नवीन अतिरिक्त तहसीलदार कार्यालय सुरू होईल.




























































