
अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण एकीकडे वाढले असतानाच ठाणे, मुंब्र्यातून सहा सज्ञान स्त्री-पुरुष बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. कापूरबावडी, कळवा, वर्तकनगर आणि मुंब्रा परिसरात तीन महिला, दोन पुरुष आणि एक तरुणी असे सहाजण वेगवेगळ्या घटनांत बेपत्ता झाले आहेत. कुटुंबाची चिंता वाढवणाऱ्या या घटनेत पोलीस सर्वांचा कसून शोध घेत आहेत.
महिला बेपत्ता
मुंब्रा येथील ३२ वर्षीय महिला बेपत्ता झाली आहे. ती घराघरांत जाऊन भांडी विक्रीचा व्यवसाय करते. सकाळी अकराच्या सुमारास ती नेहमीप्रमाणे घरातून व्यवसायासाठी बाहेर पडली. मात्र रात्री आठपर्यंत ती घरी परतली नाही. मोबाईलवर संपर्क साधला असता तो बंद होता. परिसरात आणि नातेवाईकांकडे शोध घेऊनही ठावठिकाणा न लागल्याने तिच्या दिराच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कामावर गेलेली पत्नी घरी परतलीच नाही
कळवा परिसरातील २४ वर्षीय महिला बेपत्ता झाली आहे. पतीने त्याच्या पत्नीला कापूरबावडी नाका येथील हायस्ट्रीट मॉलमध्ये कामावर सोडले होते. ती नेहमी रात्री सवाआठच्या सुमारास घरी येत असे. तिच्या मोबाईलवर संपर्क साधला असता तो बंद होता. नातेवाईकांकडे चौकशी करूनही माहिती न मिळाल्याने पतीने कापूरबावडी पोलिसांकडे धाव घेत तक्रार केली.
पत्नी जेवण घेऊन आलीच नाही
कोपरी परिसरातील तक्रारदारांची ४५ वर्षीय पत्नी दुपारी दोन वाजल्यानंतर घरातून निघून गेली. दुपारी अडीचपर्यंत ती कामाच्या ठिकाणी जेवणाचा डबा घेऊन न आल्याने पतीने घरी जाऊन चौकशी केली. मात्र ती घरात नव्हती. नातेवाईकांकडे आणि परिसरात शोध घेऊनही माहिती न मिळाल्याने कोपरी पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरुणीचा संपर्क तुटला
मुंब्रा येथील २३ वर्षीय मुलगी गुलाबपार्क मार्केट परिसरातून बेपत्ता झाली आहे. सायंकाळी ही मुलगी तिच्या आई आणि बहिणीसोबत कपडे खरेदीसाठी गेली होती. परतीच्या वेळी सायंकाळी सातच्या सुमारास गर्दीत तिचा कुटुंबीयांपासून संपर्क तुटला. ती घरी परतली नसल्याने कुटुंबीयांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला.
‘मी आता येणार नाही’
वर्तकनगर परिसरातील ४४ वर्षीय पुरुष बेपत्ता झाला आहे. रात्री जेवण देण्यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. त्यानंतर पती वागळे इस्टेट येथील त्यांच्या मॅकेनिकल पार्टच्या दुकानात जाऊन झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसातच्या सुमारास तो तेथून निघून गेला. रात्री सवाआठच्या सुमारास त्याने कुटुंबीयांना फोन करून ‘मुलांचा सांभाळ कर, दुकान बंद कर, मी आता येणार नाही,’ असे सांगितले. त्यानंतर माहिती न मिळाल्याने वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भांडणानंतर पती घरातून निघून गेला
मुंब्रा येथील महिलेने तिचा ३७ वर्षीय पती बेपत्ता झाल्याची तक्रार केली. रात्री साडेआठच्या सुमारास तक्रारदार महिलेचा पती दारूच्या नशेत घरी आला. त्यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. त्यानंतर तो कोणालाही न सांगता घराबाहेर पडला. परिसरात आणि नातेवाईकांकडे शोध घेऊनही तो सापडला नाही.





























































