
महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आजच्याच दिवशी बरोबर 19 वर्षांपूर्वी टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावत आयसीसी ट्रॉफीचा प्रदीर्घ दुष्काळ संपवला होता. 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेत ही स्पर्धा पार पडली. विशेष म्हणजे त्याच वर्षी एकदिवसीय विश्वचषकाच्या गट फेरीत बांगलादेशकडून पराभूत होऊन हिंदुस्थानी संघ बाहेर पडला होता. त्यामुळे पहिल्या टी-20 विश्वचषकासाठी बीसीसीआयने युवा संघ धोनीच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेला पाठवला.
हिंदुस्थानचा संघ विश्वचषक जिंकेल अशी अपेक्षा कोणालाही नव्हती; मात्र अंतिम सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करत धोनीसेनेने इतिहास रचला. रोहित शर्माही या संघाचा भाग होता. यावेळी त्याने केलेला एक विक्रम आजही अबाधित आहे. आयसीसी ट्रॉफी जिंकणारा सर्वात तरुण हिंदुस्थानी खेळाडू ठरण्याचा मान रोहित शर्माच्या नावावर असून या यादीत रनमशीन विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आहे.
रोहित शर्माने सर्वात तरुण हिंदुस्थानी खेळाडू म्हणून आयसीसी ट्रॉफी उंचावण्याचा विक्रम रचला. हिंदुस्थानने विश्वचषक जिंकला तेव्हा रोहितचे वय अवघे 20 वर्षे 147 दिवस होते. विशेष म्हणजे रोहितने याच स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये पदार्पण केले होते.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ‘करो या मरो’च्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात रोहितने 40 चेंडूंत मोलाची 50 धावांची खेळी केली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीत 5 चेंडूंत नाबाद 8 धावा, तर पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात 16 चेंडूंत नाबाद 30 धावांची आक्रमक खेळी करत संघाला मजबूत धावसंख्या उभारून दिली होती.
विराट कोहली यादीत चौथ्या स्थानी
दरम्यान, या यादीत विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आहे. विराटने 2011 च्या एकदिवसीय विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले तेव्हा त्याचे वय 22 वर्षे 148 दिवस इतके होते.
आयसीसी ट्रॉफी जिंकणारे सर्वात तरुण हिंदुस्थानी खेळाडू
रोहित शर्मा – 20 वर्षे 147 दिवस (2007 टी-20 विश्वचषक)
आरपी सिंह – 21 वर्षे 292 दिवस (2007 टी-20 विश्वचषक)
रॉबिन उथप्पा – 21 वर्षे 317 दिवस (2007 टी-20 विश्वचषक)
विराट कोहली – 22 वर्षे 148 दिवस (2011 एकदिवसीय विश्वचषक)
इरफान पठान – 22 वर्षे 332 दिवस (2007 टी-20 विश्वचषक)

























































