
गणपती विसर्जनानंतर मंडपातील स्टेजवर झोपले असताना वीजेचा शॉक लागून चौघांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, मध्य प्रदेशातील मंडला येथील हिरापूर गावात ही घटना घडली. गणेश विसर्जनानंतर काही लोक गणेश मंडपातील स्टेजवर झोपले होते. अचानक मंडपात वीज पसरली आणि स्टेजवर झोपलेल्या लोकांना विजेचा धक्का बसला. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्ट सर्किट किंवा तुटलेल्या वीज वाहिनीमुळे विजेचा धक्का बसला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तथापि, घटनेचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
अपघातामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय पथके घटनास्थळी दाखल झाली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस आणि प्रशासन या घटनेबाबत अधिक तपास करत आहेत.



























































