
उमरखेड शहरातील ढाणकी रोडवरील बैल बाजारासमोर ट्रॅक्टरची वेल्डिंग सुरू असताना शनिवारी दुपारी 12 वाजम्याच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. स्फोटाच्या तीव्रतेमुळे आजूबाजूला उभ्या असलेल्या काही वाहनांच्या काचाही फुटल्या.
शेख शहाब आणि अविनाश बेले अशी मृतांची नावे आहेत. तसेच वैभव मिराशे, उमेर शेख यांच्यासह अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने नांदेड येथील रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ढाणकी रोडवरील वेल्डिंग दुकानासमोर ब्लास्टिंगच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरची वेल्डिंग सुरू होती. त्याचवेळी अचानक स्फोट झाला. स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. जखमींना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने सर्व जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले.
दरम्यान, स्फोट नेमका कशामुळे झाला, ट्रॅक्टरमध्ये कोणते साहित्य होते आणि वेल्डिंग करताना आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या का? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.



























































