
निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आता विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे. या प्रकरणावरून इंडिया आघाडीतील सर्व प्रमुख पक्षांची ३० सप्टेंबरला नवी दिल्लीत एक महत्त्वाची बैठक होणार आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत निवडणूक आयोग आणि मतदार याद्यांच्या एसआयआर प्रक्रियेबाबत निर्माण झालेल्या चिंतेवर सविस्तर चर्चा केली जाईल.
या वादामुळे विरोधी पक्षांच्या एकजुटीला पुन्हा एकदा बळ मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. सीपीआय(M), सीपीआय आणि सीपीआयएमएल लिबरेशन यांसारख्या डाव्या पक्षांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याची आणि एसआयआर प्रक्रिया तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे. काँग्रेसनेही ज्ञानेश कुमार यांच्यावरील हल्ला तीव्र केला असून, २९ सप्टेंबरला पक्षाची स्वतंत्र बैठक होणार आहे. ज्यात पुढील रणनीती ठरवली जाईल. विशेष म्हणजे या मुद्द्यामुळे पश्चिम बंगालमध्ये एकमेकांचे कडवे विरोधक असलेले डावे पक्ष आणि ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस हे एकाच मंचावर आले आहेत.
सीपीआय (M) चे सरचिटणीस एम. ए. बेबी यांनी इंडिया आघाडीतील नेत्यांना पत्र लिहून या संदर्भात बैठक घेण्याची विनंती केली होती. ममता बॅनर्जी यांनीही परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सर्वांनी मिळून पावले उचलण्याची गरज असल्याचे म्हटले होते. आता विरोधी पक्ष मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी कायदेशीर सल्ला घेत संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये एक नवी नोटीस आणण्याची तयारी करत आहेत, असे वृत्तही पीटीआयने दिले आहे.































































