ज्ञानेश कुमार जनतेचे नव्हे तर सरकारचे प्रतिनिधी – रोहित पवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शनिवारी निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला. निवडणूक आयोग हा हिंदुस्थानच्या नागरिकांचा प्रतिनिधी म्हणून काम करण्याऐवजी केंद्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून काम करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका करताना रोहित पवार म्हणाले की, “निवडणूक आयोगाचे प्रमुख हे सरकारचे प्रतिनिधी नसतात, तर ते हिंदुस्थानच्या जनतेचे प्रतिनिधी असतात. यापूर्वीच्या निवडणूक आयुक्तांनी खऱ्या अर्थाने जनतेचे आणि संविधानाचे प्रतिनिधित्व केले. मात्र सध्याच्या परिस्थितीत ज्ञानेश कुमार हे जनतेचे नव्हे, तर केवळ केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व करत आहेत.”

निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवर नियंत्रण ठेवणाऱ्या २०२३ च्या कायद्यावरही रोहित पवार यांनी चिंता व्यक्त केली. या निवड समितीतून देशाच्या सरन्यायाधीशांना वगळल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. “मूळ प्रक्रियेनुसार, निवड समितीमध्ये पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश यांचा समावेश होता. मात्र, २०२३ मध्ये सरन्यायाधीशांना या पॅनेलमधून काढून त्यांच्या जागी एका मंत्र्याची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे आज निवडणूक आयोगाच्या प्रमुखाची निवड नेमके कोण करत आहे? पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि राहुल गांधी,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

केवळ एखाद्या व्यक्तीच्या राजीनाम्याची मागणी करण्यापेक्षा संपूर्ण व्यवस्थेत बदल करण्यासाठी नागरी समाज आणि विरोधकांनी एकत्र येऊन पाठिंबा दिला पाहिजे, असेही रोहित पवार म्हणाले.