
जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी रेखाटलेल्या निवडक व्यंगचित्रांचे प्रदर्शन बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ कार्टूनिस्ट्स येथे भरवण्यात आले आहे. ‘बोल्ड स्ट्रोक्स, शार्प ह्युमर’ या संकल्पनेवर आधारित या प्रदर्शनाला तुडुंब प्रतिसाद मिळत आहे. बाळासाहेबांच्या जादुई कुंचल्यामागील सूक्ष्म निरीक्षणशक्ती, मार्मिक भाष्य व धारदार उपरोधाला कलारसिक उत्स्फूर्त दाद देत आहेत. हे प्रदर्शन 19 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील.
शिवसेनाप्रमुखांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून व्यंगचित्रकार व्ही. जी. नरेंद्र यांच्या पुढाकाराने हे प्रदर्शन होत आहे. बाळासाहेबांची 100 व्यंगचित्रे व 20 दुर्मिळ छायाचित्रे प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत. प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी हे प्रदर्शनाचे क्युरेटर आहेत. प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या रसिकांना ते गॅलरीची सफर घडवत आहेत. बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांमागची कथा, व्यंगचित्रातील बारकावे आणि त्यांच्या कुंचल्याची शैली उलगडून सांगत आहेत. यातून बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांकडे पाहण्याचा वेगळाच दृष्टिकोन मिळत आहे.
व्यंगचित्र आणि कॉक्रोच पार्टी
शिवसेनाप्रमुखांची व्यंगचित्रे आजच्या काळातही किती सुसंगत आहेत हे या प्रदर्शनात पाहायला मिळत आहे. राजकारणात तरुणांनी पुढे आले पाहिजे असे म्हटले जाते. प्रत्यक्षात त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. याच अस्वस्थतेतून आज ‘कॉक्रोच पार्टी’चा जन्म झाला. साठच्या दशकातही हीच परिस्थिती होती. हे वास्तव मांडणारे व्यंगचित्र शिवसेनाप्रमुखांनी त्यावेळी रेखाटले होते. आजच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ते रसिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
प्रदर्शनात मी 20 ते 25 मिनिटांची व्यंगचित्रांचं रसग्रहण करणारी एक टूर सादर केली. या टूरनंतर काही व्यंगचित्रकारांनी दिलेली प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाची होती. ते म्हणाले, आम्ही व्यंगचित्रकार असूनही बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रातील हे बारकावे आम्हाला यापूर्वी उमगले नव्हते. – प्रशांत कुलकर्णी




























































