गणेशोत्सव काळात गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीर दंड वसुली, युवासेनेचा संताप; शाळा प्रशासनावर कारवाईची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेशोत्सवात काळात नियमित सुट्टय़ांव्यतिरिक्त गैरहजर राहिलेल्या विद्यार्थ्यांकडून वडाळा येथील सेंट जोसेफ कॉन्व्हेन्ट स्कूल या माध्यमिक शाळेने बेकायदेशीरपणे हजार रुपयांचा दंड ठोठावला. शाळा प्रशासनाच्या वसुलीविरोधात युवासेनेने संताप व्यक्त करत थेट विभागीय शिक्षण उपसंचालकांची भेट घेतली. संबंधित शाळेवर कारवाई करून दंड वसुली बंद करण्यात यावी अशी मागणी युवासेनेने निवेदनाद्वारे केली आहे.

वडाळा येथील सेंट जोसेफ कॉन्व्हेन्ट स्कूलमध्ये गणेशोत्सव काळात गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांकडून दंड वसूल करत असल्याची तक्रार पालकांनी युवासेनेकडे केली. याबाबत माहिती मिळताच युवासेनेचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत, माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर आणि कॉलेज कक्ष पदाधिकारी दुर्गेश वैद्य यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक राजेश कंकाळ यांची भेट घेतली.

घडलेला संपूर्ण प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला. शाळा प्रशासनाकडून सुरू असलेली बेकायदेशीर दंड वसुली तत्काळ बंद करून संबंधित शाळेवर कारवाई करण्यात यावी आणि पालकांना दिलासा द्यावा. तसेच इतर कोणती शाळा अशा प्रकारे दंड वसुली करत असल्यास त्यांच्यावरही बडगा उगारा अशी मागणी यावेळी युवासेनेने कंकाळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. याप्रकरणी कंकाळ यांनी त्वरित वडाळा बीट इन्स्पेक्टर वीर यांच्याशी संपर्क करून कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.