वोट चोर गद्दी छोड! घोषणांनी दिल्ली दणाणली; इंडिया आघाडीचा मोर्चा पोलिसांनी रोखला, खासदारांनी जबरदस्त एकजूट दाखवत दिला ठिय्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाच्या निवडणूक आयोगात फूट पडल्याचे वृत्त समोर आल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात देशभरात प्रचंड संताप आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवा अशी मागणी होत आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या खासदारांनी मंगळवारी ‘लोकशाही बचाव मोर्चा’चे आयोजन केले. या मोर्चाच्या वेळी ‘वोट चोर गद्दी छोड’, ‘ज्ञानेश कुमार इस्तीफा दो’, ‘नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी’, ‘एक कचोरी दो समोसा, बीजेपी पे नहीं भरोसो’, ‘वोट चोर कहां मिलेगे बीजेपी के दफ्तर में’ अशा घोषणांनी राजधानी नवी दिल्ली दणाणून सोडली. संसद भवन ते निवडणूक आयोग कार्यालय असा मार्ग निश्चत करण्यात आला असला तरी दिल्ली पोलिसांनी बॅरिकेटींग करून इंडिया आघाडीचा मोर्चा रोखून धरला. यावेळी इंडिया आघाडीच्या खासदारांनी आंदोलन करण्याचा अधिकार आपल्याला आहे असे म्हणत तिथेच ठिय्या दिला. तासाभरापासून खासदारांचा ठिय्या कायम आहे.

यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस खासदार प्रियंका गांधी, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव अशा विरोधी पक्षाच्या खासदारांनी उपस्थिती लावली. मात्र खासदारांना निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाण्यापासून काही अंतरावर रोखण्यात आले. त्यावेळी त्या सर्व खासदारांनी तिथेच ठिय्या दिला. राहुल गांधी हे बॅरिकेटवर चढून तिरंगा हातात घेऊन उभे असल्याचे पाहायला मिळाले. यानंतर खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात मोठा मोर्चा निघाला होता. तसेच शिवसेना-मनसेचा पाठिंब्यासह कॉक्रोच जनता पार्टीने शिवाजी पार्क येथे आंदोलन करत ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी करणारे आंदोलन केले होते. मुंबईसह महाराष्ट्रात झालेल्या जबरदस्त आंदोलनानंतर इंडिया आघाडीच्या खासदारांनी देखील राजधानी दिल्लीत ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्यासाठी मंगळवारी ‘लोकशाही बचाव मोर्चा’चे आयोजन केले. या मोर्चासाठी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल अशा प्रमुख विरोधीपक्षाच्या खासदारांनी हजेरी लावत जबरदस्त एकजूट दाखवली.