
निवडणूक आयोगाविरोधात देशभरात संतापाचे वातावरण असून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. एकीकडे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलने सुरू असताना दुसरीकडे आम आदमी पक्षाचे (आप) दिल्ली प्रदेश अध्यक्ष आणि माजी मंत्री सौरभ भारद्वाज यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. भारद्वाज यांच्या म्हणण्यानुसार, येत्या 10 ऑक्टोबरपूर्वी मुख्य निवडणूक आयुक्त त्यांच्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. सौरभ भारद्वाज यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
‘कॉक्रोच जनता पार्टी’ ने 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतरमंतरवर मुख्य निवडणूक आयुक्तांवविरोधात मोठे आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे राजकीय वातावरण तापू लागले आहे. सीजेपीने यापूर्वी जून आणि जुलै महिन्यात नीट (NEET) पेपरफुटी विरोधी आंदोलनादरम्यान तत्कालीन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा देण्यास भाग पाडले होते. त्यानंतर आता सीजेपी निवडणूक आयुक्तांच्या विरोधात आक्रमक झाली आहे.
सीजेपीने यापूर्वी २ ऑक्टोबर रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे निदर्शने केली होती. आता 10 ऑक्टोबरच्या जंतरमंतरवरील आंदोलनात देशभरातून नागरिक सहभागी होणार असून मुख्य निवडणूक आयुक्तांना पद सोडावे लागेल, असा दावा सीजेपी करत आहे.
सीजेपीच्या या आंदोलनाला आम आदमी पक्षाने पूर्ण पाठिंबा दिला आहे. दरम्यान, सौरभ भारद्वाज यांनी सोशल मीडियावर माहिती देताना सांगितले की, त्यांच्या सूत्रांनुसार 10 ऑक्टोबरच्या आंदोलनाआधीच ज्ञानेश कुमार राजीनामा देऊ शकतात. या दाव्यामुळे आगामी काळात राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




























































