
बिहारमधील दिघवारा गावातील 19 वर्षाच्या शुभम कुमार याच्या नावावर एक अनोखा विक्रम झालेला आहे. ‘कँडी क्रश सागा’मध्ये तब्बल 22 हजार 222 वा स्तर गाठत अनोखा विक्रम त्याने केला आहे. त्याच्या या कामगिरीची ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने दखल घेतली असून, किशोरवयीन व्यक्तीने कँडी क्रश सागामध्ये गाठलेला सर्वोच्च स्तर या श्रेणीत त्याची नोंद करण्यात आली आहे. संस्थेच्या अधिकृत माहितीनुसार, शुभमने 5 जुलै 2026 रोजी 22 हजार 222 वा स्तर पूर्ण केला. त्यावेळी त्याचे वय 19 वर्षे, 8 महिने आणि 25 दिवस होते. कँडी क्रशमधील त्याच्या या कामगिरीमुळे त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आहे.
कँडी क्रश सागा हा ‘पझल गेम’ असून, त्यात एकाच रंगाच्या कँडीज जुळवून विविध उद्दिष्टे पूर्ण करावी लागतात. गेमच्या प्रत्येक पुढील स्तरावर आव्हानाची पातळी वाढत जाते. त्यामुळे 22 हजार 222 लेव्हलपर्यंत पोहोचणे ही निश्चितच मोठी कामगिरी मानली जात आहे. मात्र, शुभमने हा विक्रम गाठण्यासाठी नेमका किती वेळ गेम खेळला, त्याचा अभ्यासावर काय परिणाम झाला किंवा त्याने शिक्षण आणि गेमिंगमध्ये कसा समतोल साधला, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नाही.


























































