
कल्याण रेल्वे स्थानकातील उपव्यवस्थापका विरोधात महिला सहकाऱ्याला आक्षेपार्ह व्हॉट्सॲप मेसेज पाठवणे आणि तिचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार महिलेने आरोपी अधिकाऱ्याला रजेसाठी व्हॉट्सॲपवर मेसेज केला होता. मात्र, रजेच्या अधिकृत विनंतीवर निर्णय घेण्याऐवजी आरोपीने तिला आक्षेपार्ह मेसेज पाठवल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. ड्युटीवर असतानाही सदर अधिकारी वारंवार वाईट नजरेने पाहायचा आणि तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा, असा आरोपही पीडित महिलेने तिच्या तक्रारीत केला आहे.
या प्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात सोमवारी संबंधित अधिकाऱ्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत गुन्हा (FIR) दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली.





























































