सौदी अरेबियाच्या किंग खालिद विमानतळावर हल्ला; सौदी एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यासह तिघांचा मृत्यू, अनेक उड्डाणे रद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सौदी अरेबियाच्या रियाध येथील किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या भीषण हल्ल्यांमध्ये नागरिक व कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. गुरुवारी झालेल्या वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये सौदी एअरलाइन्सच्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला कंपनीने दुजोरा दिला आहे. तसेच, सौदीच्या सिव्हिल एविएशन ऑथोरिटीने या हल्ल्यात तीन सौदी नागरिकांचा मृत्यू झाल्याची आणि अनेकजण जखमी झाल्याची माहिती दिली आहे.

इराण-समर्थित हुथी बंडखोरांनी गुरुवारी केलेल्या या हल्ल्यानंतर रियाध विमानतळाकडे जाणारी अनेक विमाने रद्द करण्यात आली तसेच त्यांचे मार्ग बदलण्यात आले, ज्याचा परिणाम आजही मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. गुरुवारच्या 335 विमानांच्या तुलनेत आज किमान 103 विमाने रद्द करण्यात आली आहेत. गुरुवारच्या तुलनेत विमाने रद्द होण्याचे प्रमाण काहीसे कमी झाले असले तरी त्याचा विमानसेवेवरील ताण कायम आहे. विमानतळावरील हल्ला आणि हुथींच्या सततच्या धमक्यांमुळे अनेक देशांनी सौदी अरेबियाची विमानसेवा तात्पुरती स्थगित केली आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, जर्मनीच्या लुफ्थान्सा एअरलाइन्सने सौदीच्या रियाधसाठीची विमानसेवा 16 ऑक्टोबरपर्यंत स्थगित केली आहे, तर एअर इंडियासारख्या प्रमुख कंपन्यांनी शनिवार आणि रविवारपर्यंत रियाधची उड्डाणे रद्द केली आहेत.

अल जझीराच्या वृत्तानुसार, येमेनच्या उपसंरक्षण मंत्र्यांनी सांगितले की, हुथींच्या ताब्यात असलेल्या येमेनची राजधानी सनामध्ये सतत लष्करी कारवाई सुरू आहे. फेब्रुवारी 2026 पासून मध्यपूर्वेत अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे. अशा परिस्थितीत हुथी बंडखोरांकडून सौदी अरेबियावर होत असलेले सततचे हल्ले नव्या वादाला आणि संघर्षाला तोंड फोडणारे ठरत आहेत. विमानतळावरील हल्ल्यानंतर सौदी अरेबियाने तात्काळ प्रत्युत्तर दिले असून, 8 ऑक्टोबर रोजी सौदी हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी येमेनमधील हुथींच्या ताब्यात असलेल्या भागांवर जोरदार हवाई हल्ले सुरू केले होते.