होय, मी नास्तिक आहे! न्यायालयातून मिळवला अनोखा अधिकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । फतेहबाद

वर्षभर कोर्टाच्या पायऱया झिजवून मध्य प्रदेशातील एका व्यक्तीने स्वतःला नास्तिक म्हणवून घ्यायचा अनोखा अधिकार मिळवला आहे. रविकुमार असे त्याचे नाव असून त्याने स्वतःला नास्तिक जाहीर करून आपल्या हातावरही नास्तिक असल्याचे गोंदवून घेतले आहे. आता न्यायालयानेही त्याला त्यासाठी परवानगी दिली आहे.

रविकुमार या टोहाना गावचा आहे. तो मागासवर्गातील असून 12 वीपर्यंत शिकलेला आहे. देशामध्ये जाती आणि धर्माच्या नावाखाली लोकांमध्ये गटातटांत विभागले जात आहे, त्यामुळे मला गुदमरल्यासारखे होते, असे त्याने म्हटले आहे. तसेच धर्म आणि जात याचा शोध माणसाने लावलाय. आपण त्याचे मानसिक गुलाम बनलोय. त्यापासून मुक्ती हवेय, असे रविकुमारचे म्हणणे आहे. त्याने शैक्षणिक प्रमाणपत्र आणि आधार कार्डावर स्वतःच्या नावापुढे नास्तिक हा शब्द जोडून घेतला आहे. दोन्ही हातांवरही इंग्रजीत नास्तिक असे गोंदवून घेतले आहे.

रविकुमारने नास्तिक असण्यासाठी कायदेशीर परवानगी घेण्यासाठी 2017 मध्ये न्यायालयात याचिका दाखल केली होती. टोहानातील दिवाणी न्यायालयात एक वर्ष त्याचा खटला चालला. त्यानंतर आता न्यायालयाने त्याला नास्तिक असण्याचा हक्क दिला आहे.

कुटुंबाची साथ
रविकुमार याला एक भाऊ आणि दोन बहिणी आहेत. तो वडिलांसोबत सुतारकाम करतो. सुरुवातीला त्याच्या कुटुंबाला त्याचे विचार पटत नव्हते. मात्र न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर कुटुंबातील सदस्यांचे विचार बदलले आहेत. ते रविकुमारच्या बाजूने उभे राहिले आहेत.

भगतसिंग आदर्श
शहीद भगतसिंग हे नास्तिक रविकुमारचे आदर्श आहेत. रविकुमार सांगतो, इतिहासाचा धांडोळा घेतला तर भगतसिंग हे महान क्रांतिकारी नास्तिक होते म्हणूनच ते मला पूज्य आहेत.