
स्वच्छेतेमध्ये देशात तिसरे आणि राज्यात पहिले मानांकन मिळणारी नवी मुंबई महापालिका नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यात अपयशी ठरली आहे. शहरात पालिका रुग्णालयांच्या इमारती फक्त झक्कास दिसत असल्या तरी या इमारतींमध्ये मिळणारी वैद्यकीय सेवा पूर्णपणे भकास झाली आहे. त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी मुंबई आणि ठाण्याची वाट धरावी लागत आहे, असे ऑपरेशन नगरसेवकांनी आज महासभेत केले.
आरोग्य विभागाच्या या गलथान कारभारावर सभागृहाचे लक्ष वेधण्यासाठी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी आज महासभेत लक्षवेधी मांडली. या लक्षवेधीवर चर्चा करताना नगरसेवकांनी आरोग्य विभागाच्या अब्रूची लक्तरे थेट नवी मुंबईच्या वेशीवर टांगली. आरोग्य विभागाकडे मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे उपचार दर्जेदार मिळत नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. सोनम डोंगरे यांच्या मृत्यूचा अहवाल महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सभागृहात मांडला. त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी सात सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली होती. डोंगरे यांचा मृत्यू चुकीच्या इंजेक्शनमुळे झाला नसल्याचे उघड झाले आहे



























































