दादरच्या ‘आरए रेसिडेन्सी’मध्ये 44व्या मजल्यावर भीषण आग; इमारतींच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

दादर पूर्वेकडील गगनचुंबी इमारत ‘आरए रेसिडेन्सी’च्या 44 व्या मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी उशिरा रात्री घडली. सुदैवाने आग लागलेल्या फ्लॅटमध्ये कुणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र 44 व्या मजल्यावर लागलेली आग विझवण्यासाठी पालिकेच्या अग्निशमन दलाला मोठी कसरत करावी लागली. त्यामुळे आगीने भीषण रूप धारण केल्याने काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, या इमारतीमधील अग्निशमन यंत्रणा बंद असल्याचे समोर आल्याने मुंबईतील गगनचुंबी इमारतींमधील अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

‘आरए रेसिडेन्सी’ या इमारतीत तळघर, 5 पोडियम मजले आणि सहाव्या ते 46 पर्यंत निवासी गाळे आहेत. इमारतीच्या 42 व्या मजल्यावरील बंद असलेल्या फ्लॅट क्रमांक 4201 मध्ये रात्री 10.30च्या सुमारास आगीची ठिणगी पडली. या ठिकाणचे इलेक्ट्रिक वायरिंग, फर्निचर, पलंग गाद्या, दरवाजे, एसी, किचन डक्ट, एलपीजी सिलिंडर, फ्रीज असे सामान होते. त्यामुळे काही वेळातच आग भडकल्याने 11.10 वाजता अग्निशमन दलाकडून ही आग ‘लेव्हल-4’ची असल्याचे जाहीर करण्यात आले. यात इमारतीत अग्निशमन यंत्रणा कार्यरत नसल्याने अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागला. घटनास्थळी 14 फायर इंजिन, 90 मीटर उंच शिडी असलेली फायर इंजिन, वॉटर जेट लाईनच्या सहाय्याने तब्बल साडेचार तासांच्या प्रयत्नांनंतर मध्यरात्री 3.50 वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

अग्निशमन दलाने बजावली नोटीस

ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाकडून व्यक्त करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास अग्निशमन दल आणि पोलिसांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, आग लागताच इमारतीमधील रहिवाशांनी बाहेर धाव घेतली. सुदैवाने इतर फ्लॅटमध्ये आग पसरली नसल्याने मोठा धोका टळला. इमारतीमधील अग्निशमन यंत्रणा बंद असल्याने शिडीच्या माध्यमातूनही पाणी 42 व्या मजल्यापर्यंत नेण्यासाठी अग्निशमन दलाला कसरत करावी लागली. अग्निशमन यंत्रणा बंद असल्याबद्दल इमारतीला अग्निशमन दलाकडून नोटीस बजावण्यात आली आहे