अरे नाही ऐकत जा…! तरुणाने सोमय्यांचे कान उपटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

मुलुंडमध्ये होऊ घातलेल्या प्रकल्पग्रस्त वसाहतींच्या बांधकामांविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नुकतेच ऐन गर्दीच्या मुलुंड स्टेशन गाठून सह्यांची मोहीम राबवली. परंतु सायंकाळी घरी जाण्याच्या वेळी चाकरमान्यांच्या पायात घुटमळणाऱया सोमय्यांचे कान महिलांसह एका तरुणाने उपटले. सोमय्या पायऱयांवर उभे राहून पत्रके वाटत असताना तरुणाने त्यांना सुनावले. ‘सरकार यांचेच, सगळे यांचेच… दोन मिनिटांत प्रकल्प बंद करू शकतात. यांचेच लागेबांधे तिकडे गुंतले आहेत, सह्यांच्या मोहिमा कसल्या घेताय?’ अशा शब्दांत फैलावर घेतले. ‘अरे, नाही ऐकत जा…’ असे त्या तरुणाने खडसावत सोमय्या आणि त्यांच्या बगलबच्च्यांची बोलती बंद केली.

सोमय्या आणि त्यांच्या बगलबच्च्यांना पाहून महिला प्रवाशांच्या संतापाचा कडेलोट झाला. कामावरून येणाऱया माणसांना त्रास होतो हे कळत नाही का? रस्ता सोडा जरा… माणूस थकून भागून येतो… यांचं काय रोजचीच आश्वासने देतात… अशा शब्दांत महिला चाकरमान्यांनी सोमय्या यांच्याबद्दल प्रचंड संताप व्यक्त केला. तरुणाने जेव्हा सोमय्या आणि त्यांच्या बगलबच्च्यांना फैलावर घेतले तेव्हा त्यांनी या तरुणाला अडवण्याचा प्रयत्न केला आणि तिथून जाण्यास सांगितले. त्यावेळी या तरुणाने तू मला कोण सांगणार बाजूला व्हायला… तुम्हीच बाजूला व्हा ना… मला तुमची नाटके चांगलीच माहीत आहेत. हे तुमचे नेहमीचेच आहे, असे खडे बोल सोमय्यांना सुनावले.