सीमा भागातील मराठी बांधवांचा छळ थांबावा! महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या नव्या नात्याला सुरुवात व्हावी!!

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी कर्नाटकात स्थापन होत असलेल्या नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत. कर्नाटकात ज्यांनी वाद घडवून आणले ते हरले, आता कर्नाटकात नवी सुरुवात होत आहे. यानिमित्ताने आम्ही कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री सिद्धरामया आणि उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांना शुभेच्छा दिल्या आहेत असे आदित्य यांनी म्हटले. कर्नाटकात नवी सुरुवात होत असतानाच महाराष्ट्र आणि कर्नाटकातील नात्यातही नवी सुरुवात व्हावी असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. या नव्या नात्याची सुरुवात होत असताना सीमाभागातील मराठी बांधवांचा छळ होऊ नये, त्यांना त्रास होऊ नये सीमावाद चांगल्या मार्गाने सुटावा अशी अपेक्षा आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.

कर्नाटकात स्थापन होत असलेल्या सरकारचा मुद्दा धरून आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील मिंधे गट आणि भाजप सरकारवरही सडकून टीका केली. कर्नाटकात भाजप सरकारच्या काळातील 40 टक्के कमिशनचा मुद्दा गाजला होता. कर्नाटकात जर 40 टक्के भ्रष्ट सरकार असेल तर इथे 100 टक्के भ्रष्ट सरकार आहे असे आदित्य यांनी म्हटले. नालेसफाईच्या कामांची मुख्यमंत्री पाहाणी करत आहे, मात्र संपूर्ण राज्यात चिखल केल्यानंतर आता नालेसफाई करून काय उपयोग असा तिरकस टोलाही आदित्य यांनी लगावला. आदित्य यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना म्हटले की, ‘मुंबईत पावसाळ्यात सगळ्यांना त्रास होणार आहे. डिलाईल रोडचे काम रखडले आहे. गोखले पूल सुरू होण्यासही आणकी विलंब होणार आहे. एकंदर यांना कारभार जमत नाही, गोंधळ सुरू आहे. मुख्यमंत्र्यांना स्वत:चं पद कसं वाचवून ठेवायं एवढंच माहिती आहे यापलिकडे काही येत नाहीये.’