
ज्या कंत्राटदाराला मुंबईच्या पूर्व उपनगरात हजार कोटींची कामं दिली आहेत, त्याच कंत्राटदाराकडे असलेला चिपळूणचा पूल पडला. त्याबाबत चौकशी अहवाल आला का? तसंच, लाडक्या पाच कंत्राटदारांपैकी एका कंत्राटदाराच्या टर्मिनेशन नोटिसीची मुदत 26 ऑक्टोबरला संपली आहे. या कंत्राटदाराच्या उत्तरावर पालिकेत सुनावणी होणार आहे. आता या सुनावणीत खोके सरकारसोबत कंत्राटदाराची सेटलमेंट होणार की त्याच्यावर कारवाई होणार, असा रोखठोक सवाल युवासेना प्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
मुंबईत रस्ते बांधकामप्रकरणी सुरू असलेल्या घोटाळ्यावर आदित्य ठाकरे यांनी कडाडून टीका केली. मुंबई येथे एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आदित्य ठाकरे म्हणाले की, हा विषय नवी मुंबईचा असू शकतो, ठाण्याचा, नागपूर, नाशिक कोल्हापूर सगळीकडचा असू शकतो. कारण हा विषय फार महत्त्वाचा आहे. ज्या ज्या शहरांमध्ये प्रशासक आहेत, महापौर नाहीयेत, लोकप्रतिनिधी नाहीयेत, नगर सेवक नाहीयेत तिथे एकंदर जो घोटाळा सुरू आहे, तो आम्ही आपल्यासमोर आणला आहे. जानेवारीमध्ये पहिली पत्रकार परिषद झाल्यानंतर रस्त्यांचे विषय मी घेत होतो. तेव्हा देखील मी सांगितलं होतं की हा विषय फक्त घोटाळा, घोटाळा आणि घोटाळाच आहे, दुसरं काहीही या खोके सरकारने केलेलं नाही.
चिपळूण येथील पूल दुर्घटनेविषयीही प्रश्नांची सरबत्ती करताना ते म्हणाले की, ‘दुसऱ्या कंत्राटदाराचा विषय असा आहे की, हजार कोटीची कामं मुंबईच्या पूर्व उपनगरात ज्या कंत्राटदाराला दिली आहेत, त्या कंत्राटदाराकडे कंत्राट असलेला चिपळूणचा पूल पडला. त्या पुलाची नक्की काय चौकशी झाली, त्याचा अहवाल आला का, कंत्राटदारावर कारवाई होणार का, आणि तिथे कारवाई होणार असेल, तर मुंबईतल्या कामाबद्दल काय हा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे. 1 ऑक्टोबर ते 31 मे या कालावधीत मुंबईतील रस्त्यांची कामे केली जातात. ऑक्टोबरचा संपूर्ण महिना गेला आहे तरी याच्या कामांना अद्याप सुरुवात झाली नसल्याकडेही आदित्य ठाकरे यांनी लक्ष वेधले.
एकाबाजूला रस्त्यांची कामं, दुसऱ्याबाजूला वॉर्ड ऑफिसर नाहीत. कचरा उचलला जात नाहीये. प्रदुषण वाढत असताना आयुक्त नुसते गाईडलाईन काढत असतात. त्याला न पाळणाऱे लोक किती आहेत. त्यावर नियंत्रण, कारवाई केलीय का, कुठेच काही पत्ता नाही. नुसते आरोप करायचे आणि मग गाईडलाईन काढायची असं घाणेरडं, प्रदुषित राजकारण आज आपल्या राज्यात सुरू आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. आमचे सरकार आल्यानंतर साडेआठ हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्यांना जेलमध्ये टाकणार म्हणजे टाकणारच, असे आदित्य यांनी म्हटले.






























































