Lok Sabha Election 2024 : हक्क मागणाऱ्यांना सरकार इतकी वाईट वागणूक का देतेय? आदित्य ठाकरे यांचा घणाघात

स्वतःचे हक्क मागणाऱया शेतकऱ्यांना सरकार दहशतवादी ठरवून कारवाई करीत आहे. शिवाय लडाखवासीयांवर होणारा अन्याय आणि हिंदुस्थानचा भूभाग बळकावणाऱया चीनविरोधात 21 दिवस आंदोलन करूनही कोणतीही ठोस भूमिका न घेता सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाकडे केंद्र सरकार सपशेल दुर्लक्ष करीत आहे. स्वतःचे हक्क मागणाऱ्या हिंदुस्थानच्या नागरिकांना सरकारकडून इतकी वाईट वागणूक का दिली जाते, असा घणाघाती सवाल शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

केंद्र सरकारच्या देशात सुरू असलेल्या हुकूमशाहीचा आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर चांगलाच समाचार घेतला आहे. सरकारचे लोकशाहीविरोधी राजवटीत रूपांतर होत असताना संपूर्ण जग पाहत असल्याचा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. केंद्र सरकार कोणाशीही संवाद साधायला इतके का घाबरते, असा सवालही त्यांनी केला आहे. लडाखमधील स्थितीवरून वांगचुक आंदोलन करीत असताना त्याकडे पाहायला सरकारला वेळ नाही. शेतकऱ्यांचे लोकशाही मार्गाने चाललेले आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकार करीत असल्याचेही ते म्हणाले.

शेतकऱ्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक

आपल्या न्याय्य मागण्या आणि केंद्र सरकारचे शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी हजारो शेतकरी आंदोलन करीत आहेत. कारण केंद्र सरकारने आश्वासन देऊन दोन वर्षे उलटली तरी अद्याप कोणत्याही आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. शेतकऱयांनी संयमाने दोन वर्षे वाट पाहिली. मात्र केंद्र सरकार मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रचंड दिरंगाई करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर या शेतकऱ्यांनी दिल्लीकडे मोर्चा वळवला. मात्र या शेतकऱयांना सरकारकडून दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली जात असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.