लोकांचा ऑक्सिजन काढून घेतलात तर बुलेट ट्रेन, मेट्रो कुणासाठी? आदित्य ठाकरे यांचे पर्यावरण परिषदेत परखड मत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘झाडे ही आपल्याला ऑक्सिजन पुरवतात. जगवतात. विकास हा लोकांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी केला जातो. विकासासाठी झाडांची कत्तल करून लोकांचा ऑक्सिजनच काढून घेतलात तर बुलेट ट्रेन, मेट्रो कुणासाठी?’ असा परखड सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज केला.

चेन्नई येथे आयोजित ‘थिंक एज्यु 2023’ या परिषदेत ‘वातावरणातील बदल ः आपल्याला काळजी करण्याची गरज का?’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. मुंबईतील विकासाबाबत विचारलेल्या प्रश्नांवर आदित्य ठाकरे यांनी या चर्चासत्रात अभ्यासपूर्ण उत्तरे दिली. विकासाच्या नावाखाली झाडे तोडून पर्यावरण नष्ट केले जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रत्येक गोष्टीत समतोल असायला हवा असे सांगतानाच ते म्हणाले की, ‘आम्हाला बुलेट ट्रेन, मेट्रो आणि रस्ते हवे आहेत. पण आपण हे कोणासाठी तयार करत आहोत? लोकांसाठी. आणि जीवनाच्या गुणवत्तेसाठी. त्यासाठी झाडे तोडण्यास सुरुवात केली आणि लोकांचा ऑक्सिजनच काढून घेतलात, जीवनाचा दर्जा खराब केलात

तर मग बुलेट ट्रेन, मेट्रो आणि रस्ते कुणासाठी?’

पत्रकार कावेरी बामजाई यांनी विचारलेल्या प्रश्नांना आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या उत्तरांवर उपस्थितांनीही टाळ्यांनी दाद दिली. मिंधे सरकारकडून सत्तेचा गैरवापर होत असल्याची टीका करतानाच, सत्ता ही शाश्वत नसते हे नेहमी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

लोकांचा ऑक्सिजनच काढून घेतलात तर बुलेट ट्रेन, मेट्रो कुणासाठी?

मुंबईतील विकासाबाबत विचारलेल्या प्रश्नांवरही आदित्य ठाकरे यांनी अभ्यासपूर्ण उत्तरे दिली. विकासाच्या नावाखाली झाडे तोडून पर्यावरण नष्ट केले जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रत्येक गोष्टीत समतोल असायला हवा असे सांगतानाच ते म्हणाले की, ‘आम्हाला बुलेट ट्रेन, मेट्रो आणि रस्ते हवे आहेत. पण आपण हे कोणासाठी तयार करत आहोत? लोकांसाठी आणि जीवनाच्या गुणवत्तेसाठी. त्यासाठी झाडे तोडण्यास सुरुवात केली आणि लोकांचा ऑक्सिजनच काढून घेतलात, जीवनाचा दर्जा खराब केलात तर मग बुलेट ट्रेन, मेट्रो आणि रस्ते कुणासाठी?’

ठाकरे कुटुंबातील कलात्मक दृष्टीचा वापर मुंबईच्या विकासासाठी

‘माझे आजोबा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना निसर्गाची चांगली जाण होती. माझे वडील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे उत्कृष्ट छायाचित्रकार आहेत. भाऊ तेजस हासुद्धा वन्यप्रेमी असून त्याने अनेक दुर्मिळ प्रजातींचा शोध लावला आहे. मलाही पर्यावरणाची आवड आहे. माझ्या कुटुंबातली हीच कलात्मक दृष्टी आम्ही मुंबईच्या विकास कामांमध्ये वापरली.’ असे आदित्य ठाकरे यांनी यावेळी अभिमानाने सांगितले.

पर्यावरण रक्षणातून उद्योगांनाही चालना

पर्यावरण रक्षणातून उद्योगांनाही चालना मिळेल असा आत्मविश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी इलेक्ट्रिक वाहनांचे उदाहरण दिले. ‘प्रदूषण नियंत्रणासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार असताना आम्ही सरकारी वाहने इलेक्ट्रिक असावीत यासाठी प्रयत्न केले. मुंबईत बेस्ट उपक्रमासाठी दहा हजार इलेक्ट्रिक बस घेतल्या. पुण्यामध्येही त्यासाठी प्राधान्य दिले. परिणामी इलेक्ट्रिक वाहनांसाठी ऑर्डर्स वाढल्या.’ असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

…अन्यथा जमिनीची भूजल पातळी खाली जाईल

‘रेन वॉटर हार्वेस्टिंग तंत्र चांगले आहे. आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग क्षेत्र तयार करत आहोत, जे खूप छान आहे. पण आता पावसाचे पाणी झिरपणारे खड्डेही हवेत. अन्यथा आपल्या जमिनीची भूजल पातळी खाली जाईल.’, असा धोकाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. हवामान आणि पर्यावरण क्षेत्रात तामिळनाडू चांगले काम करत आहे असेही ते म्हणाले.