‘आपला दवाखाना’ सफाई कामगारांना तीन महिने पगाराची कवडीही नाही; १३० कर्मचाऱ्यांची केडीएमसीवर धडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागा अंतर्गत कार्यरत असलेल्या एचडब्ल्यूसी आणि ‘आपला दवाखाना’ येथील अटेंडंट व सफाई कामगारांना तीन महिने पगाराची कवडीही मिळाली नाही. त्यामुळे त्यांना संसार चालवणे कठीण झाले आहे. तोंडावर आलेला गणेशोत्सव कर्ज काढून साजरा करण्याची वेळ कामगारांवर आली आहे. त्यामुळे संतापलेल्या १३० कर्मचाऱ्यांनी आज केडीएमसीवर धडक मोर्चा काढत प्रशासनाचे लक्ष वेधले.

जून, जुलै आणि ऑगस्ट तीन महिन्यांचा पगार न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांसमोर घरखर्च भागविण्याबरोबरच मुलांच्या शिक्षणाचा खर्च, दैनंदिन गरजा तसेच सणासुदीचा खर्च भागविण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. वारंवार मागणी करूनही ठेकेदार लक्ष देत नाही. कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतनानुसार दरमहा १५ हजार ५०० रुपये वेतन मंजूर आहे. मात्र दिशा एजन्सीकडून किमान वेतनापेक्षा कमी पगार दिला जातो आणि तोही वेळेत दिला जात नाही, केला. असा आरोप या वेळी कर्मचाऱ्यांनी काही कर्मचाऱ्यांनी तर प्रत्यक्षात ५ हजार ५०० रुपयेच मिळत असल्याचे सांगितले. त्यामुळे मंजूर वेतन आणि प्रत्यक्ष मिळणारे वेतन याची चौकशी करून कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच तीन महिन्यांचे थकीत वेतन तातडीने अदा करावे, शासनमान्य पूर्ण किमान वेतन द्यावे आणि दर महिन्याच्या १० तारखेपर्यंत वेतन थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल, अशी व्यवस्था करावी, अशी मागणी आंदोलक कर्मचाऱ्यांनी केली.

कंत्राटदाराचे दुर्लक्ष
एचबीटी आणि एचडब्ल्यूसी केंद्रांमध्ये कार्यरत अटेंडंट व सफाई कामगारांचे वेतन दिशा एजन्सीच्या कंत्राटदारामार्फत केले जाते. गेल्या तीन महिन्यांचा पगार मिळावा यासाठी कंत्राटदाराकडे वारंवार मागणी करण्यात आली. मात्र कंत्राटदाराने दुर्लक्ष केल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला.