हत्येच्या गुन्ह्यात फरार आरोपीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हत्येच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला अखेर धारावी पोलिसांनी अटक केली. प्रशांत दिलीप कुंचिकर्वे असे त्याचे नाव असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर या गुन्ह्यात फरार असलेल्या तिसऱया आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

धारावी येथे राहणारा निशाद शेख ऊर्फ अली हा गेल्या वर्षी त्याचा मित्र जेळू हनयासोबत जेवणासाठी गेला होता. जेवण केल्यावर ते मध्यरात्री घरी जात होते. रस्ता ओलांडत असतानाच अविनाश बारसकळेला अलीचा धक्का लागला होता. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात त्याने अलीला मारहाण केली. डोक्यात पेव्हर ब्लॉक मारल्याने अली गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती समजताच धारावी पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी अलीला उपचाराकरिता शीव रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अलीच्या मृत्यूप्रकरणी धारावी पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. वरिष्ठ निरीक्षक बळवंत पाटील यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक विजय खंडागळे यांच्या पथकाने तपास करून अविनाशला अटक केली. त्याच्या चौकशीत प्रशांतचे नाव समोर आले. सात महिन्यांनंतर अखेर पोलिसांनी प्रशांतला धारावी येथून अटक केली.