घराची किंमत ठरवण्यासाठी मागितली लाच, अभियंता अविनाश भानुशाली याला एसीबीने रंगेहाथ पकडले

मुंबई-बडोदा महामार्गाचे सध्या भूसंपादन सुरू आहे. त्यात बाधित होणाऱ्या घराची किंमत ठरवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इंजिनीयरने एक लाख रुपयाची लाच मागितली असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. अविनाश भानुशाली (57) असे या लाचखोर इंजिनीयरचे नाव असून एसीबीने कार्यालयातच ट्रॅप लावून त्याला रंगेहाथ पकडले. या चिरीमिरीमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांचीदेखील तंतरली आहे.

मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्ग कल्याणनजीकच्या रायते गावातून जात असून संबंधित तक्रादाराच्या घराचे बांधकाम यात बाधित होत आहे. त्याचे मूल्यमापन करून अहवाल देण्यासाठी इंजिनीयर भानुशाली याने 9 सप्टेंबर रोजी पडताळणी दरम्यान यापूर्वी 4 लाख घेतले. त्यानंतर आणखी 1 लाख रुपये द्या नाहीतर अहवाल मिळणार नाही, अशी मागणी केली होती. यामुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या प्रकरणी तक्रार केली होती.

ठाणे एसीबी युनिटने आज दुपारी 1वाजण्याच्या सुमारास कल्याण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात सापळा रचून एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना भानुशाली याला अटक केली. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे इंजिनीयर अविनाश भानुशाली हा सहा महिन्यांनी निवृत्त होणार होता. त्यापूर्वीच त्याने लाच घेतल्याने त्याचा मोठा फटका भानुशाली याला बसणार आहे.

15 दिवसांत तिघे जाळ्यात

गेल्या 15 दिवसांत कल्याण-डोंबिवलीतील तीन प्रशासकीय अधिकारी ठाणे एसीबीच्या जाळ्यात सापडले आहेत. 30 ऑगस्ट रोजी कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे, त्याचा शिपाई बाबू हरड यांना 1 लाख 20 हजारांची लाच घेताना अटक केली होती. त्यानंतर 7 सप्टेंबर रोजी केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील वाळंज याला 4 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या