ढोकी पोलीस ठाण्यातील दोन सहाय्यक पोलीस निरीक्षकांवर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । धाराशिव

तक्रारीतील आरोपींवर कडक कारवाई करण्यासाठी ढोकी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत जाधव व ज्योतीराम कवठे यांनी संबंधिताकडे लाचेची मागणी केल्याने त्यांच्याविरुध्द ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच वेळी ढोकी पोलीस ठाण्यातील दोन सहाय्यक पोलीस निरीक्षकांवर लाच मागीतल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ढोकी पोलीस ठाण्यात एक एन. सी. दाखल असून सदर एन. सी. मधील गैर अर्जदार यांच्यावर कडक प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी संबंधिताकडे ढोकी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत धनसिंग जाधव (४८) व ज्योतीराम गणपत कवठे (५२) यांनी लाचेची मागणी केल्याची तक्रार संबंधिताने धाराशिव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.

या तक्रारीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधिक्षक बी. व्ही. गावडे व पोलीस निरीक्षक विनय बहिर यांनी तक्रारीची शहानिशा केली. यावेळी तक्रारीत तत्थ्य आढळल्याने ढोकी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत धनसिंग जाधव यांनी ४० हजार रुपये व ज्योतीराम गणपत कवठे यांनी २ हजार लाचेची मागणी केल्यावरुन ढोकी पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (सुधारण २०१८) अंतर्गत पोलीस ठाणे, ढोकी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक विनय बहिर हे करीत आहेत.