
पुणे-बंगळुरू महामार्गावरील कराड तालुक्यातील उंब्रजजवळ ट्रॅव्हल्स तारळी नदीपात्रात कोसळून पाचजण ठार झाले, तर सहाजण जखमी झाले आहेत. तर, पुणे-सोलापूर माहामार्गावर रुग्णवाहिका ट्रकला धडपून तीनजण ठार, तर 13 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, दिवाळीच्या पूर्वसंध्येला नगर जिह्यातील श्रीगोंदा तालुक्यात पाय घसरून विहिरीत पडल्याने दोन बालकांचा मृत्यू झाला आहे.
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर उंब्रज (ता. कराड) गावच्या हद्दीत वाशी येथून गोव्याला पर्यटनासाठी जाणाऱयांची खासगी मिनी बस तारळी पुलाचा कठडा तोडून सुमारे चाळीस फूट तारळी नदीपात्रात कोसळली. या भीषण अपघातात पाचजण जागीच ठार झाले आहेत. तसेच, सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातग्रस्त गाडीतून चालकासह एपूण 13 जण प्रवास करत होते.
श्रीगोंद्यात विहिरीत पडून दोन बालकांचा मृत्यू
नगर – श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील लगडवाडी परिसरात विहिरीमध्ये पाय घसरून भावंडांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आविष्कार सोनवणे व कार्तिक सोनवणे अशी मृत बालकांची नावे आहेत.
रुग्णवाहिका ट्रकला धडकून एकाच कुटुंबातील 3 ठार
सोलापूर – पुणे-सोलापूर महामार्गावर रुग्णवाहिकेचा अपघात झाला. या अपघातात 3 जण ठार झाले असून, 13 जण जखमी झाले आहेत. मृत आणि जखमींना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतदेह घेऊन पुणे येथून तेलंगणा येथे जात असताना हा अपघात घडला आहे.
यामध्ये रवि माणिक राठोड (वय 38), बुद्धीबाई चण्णा पाळत्या (वय 48) आणि चालकाचा जागीच मृत्यू झाला. चालकाची ओळख अद्यापि पटलेली नाही. गोपाळ धनसिंग राठोड (वय 45), गणेश धनसिंग राठोड, रामलू धनसिंग राठोड, राम सोमनाथ राठोड (वय 34), आशा सुभाष राठोड (वय 40), लोकेश धनसिंग राठोड, किसन रामलू राठोड, रवि गोपाळ राठोड, रमेश रावजी राठोड, किसन नारायण राठोड, अनुशा खाद्रवल अशी जखमींची नावे आहेत.




























































