
सामना ऑनलाईन । मुंबई
डॉ. पायल तडवीचे रॅगिंग करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या नायर रुग्णालयातील तीन महिला डॉक्टरांना मुंबईतील विशेष न्यायालयाने 31 मेपर्यंत पोलीस रिमांडवर पाठवले. आत्महत्येपूर्वी डॉ. पायलने एखादी सुसाईट नोट लिहून ठेवली असावी तसेच या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा असलेली ही सुसाईड नोट या तिघा डॉक्टरांनीच नष्ट केली असावी असा पोलिसांना संशय असून त्यादृष्टीने तपास करता यावा म्हणून या डॉक्टरांना 14 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी विनंती पोलिसांतर्फे करण्यात आली, परंतु सत्र न्यायाधीश आर. एम. सदरानी यांनी या तिघांना तूर्त तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी नायर रुग्णालयातील डॉ. भक्ती मेहेर, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघींना अटक करून बुधवारी दुपारी विशेष न्यायालयात हजर केले. गेल्याच आठवडय़ात या तिघींविरुद्ध रॅगिंग, अनुसूचित जातीजमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पोलिसांनी या तिघींना अटक करून त्यांचे मोबाईलही जप्त केले आहेत. व्हॉटस्ऍपमधील मेसेजेस, व्हॉटस्ऍपवरून डॉ. पायलशी केलेले चॅटिंग या सर्व पुराव्यांची माहिती मिळविण्यासाठी पोलिसांना या आरोपींची पोलीस कोठडी हवी आहे. डॉ. पायलच्या मृतदेहावर जखमा आढळून आलेल्या आहेत. त्या दृष्टीनेही पोलिसांना तपास करायचा आहे. शवविच्छेदन अहवालही अजून मिळालेला नाही. त्यामुळेच आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी करीत आहेत असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. पोलिसांची विनंती मान्य करून न्यायाधीश सदरानी या डॉक्टरांना 14 दिवसांच्या रिमांडवर पाठवणार तोच या तिन्ही डॉक्टरांचे वकील ऍड. आबाद पोंडा यांनी अचानक न्यायालयात एण्ट्री करून त्याला जोरदार विरोध केला. या डॉक्टरांचा डॉ. पायल तडवीच्या आत्महत्येशी काहीही संबंध नाही, असेही यावेळी ऍड. पोंडा म्हणाले.
‘डीन’च्या चेंबरबाहेर तीन तास
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाशी आपला दुरान्वयानेही संबंध नाही हे सांगण्यासाठी तसेच या प्रकरणात आपली बाजू स्पष्ट करण्यासाठी घटनेच्या दिवशी आम्ही तब्बल तीन तास ‘डीन’च्या चेंबरबाहेर बसून होतो, परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही अशी माहिती अटकेत असलेल्या तीनही डॉक्टरांनी बुधवारी न्यायाधीशांसमोर दिली. या प्रकरणात तुम्हाला काही सांगायचे आहे का, असा प्रश्न न्यायाधीश सदरानी यांनी केला त्यावेळी या डॉक्टरांनी वरील खुलासा केला.
आरोपींचे वकील काय म्हणाले?
- डॉ. पायल तडवी यांच्या जातीबद्दल या तिन्ही डॉक्टरांना कोणतीही माहिती नव्हती. विशेष म्हणजे आपण आदिवासी समाजाच्या आहोत हे रुग्णालयात कुणालाही माहीत नाही असा व्हॉटस्ऍप मेसेज स्वतः पायलने आपल्या आईला पाठविलेला आहे
- एखाद्या व्यक्तीला हेतुपुरस्सर छळण्याचा प्रयत्न केल्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे आरोप केले जाऊ शकतात, परंतु या प्रकरणात तर या डॉक्टरांनी डॉ. पायल हिला काम करताना दम दिलेला आहे. असे करताना तिला छळण्याचा येथे कोणताही उद्देश नव्हता असा दावाही ऍड. पोंडा यांनी केला.
- डॉ. पायल हिने कौटुंबिक वादातून आत्महत्या केली असावी
डॉ.पायलच्या वकिलांचा दावा - डॉ पायलने आत्महत्या केली नसून तीचा खून झाला करण्यात आला आहे.
- तीच्या मृतदेहावर जखमा आढळल्या आहेत.
पुढे काय होणार
- पायलने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी त्या तीन डॉक्टरांनी तर काढून घेतली नसेल ना असा पोलिसांना संशय आहे.
- आत्महत्येपूर्वीची चिठ्ठी कुठे लपवून ठेवली आहे का, ती नष्ट केली का या दृष्टीने पोलीस तपास करणार आहेत. न्याय सहायक प्रयोगशाळेची घेणार मदत
पोलिसांनी त्या तिन्ही डॉक्टरांचे मोबाईल जप्त केले आहेत. व्हॉट्सऍप वर झालेले ते संवाद डिलीट केल्याचा पोलिसांना संशय आहे. तांत्रिक विश्लेषणाकरता मोबाईल कालिना येथील न्याय सहायक प्रयोगशाळेत पाठवणार आहेत.

























































