कोलकात्यात ज्युनियर महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणाने पश्चिम बंगालसह देशभरात खळबळ माजली आहे. हे प्रकरण उघडकीस येताच संतापाची लाट उसळली आहे. घटना उघड होताच पोलिसांनी वेगाने तपासाची सूत्रे हलवली. आरोपीने गुन्हा लपवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र त्याचा हा प्रयत्न सपशेल अपयशी ठरला. पोलिसांच्या तीक्ष्ण नजरेने ‘ती’ वस्तू हेरली अन् आरोपीचं बिंग फुटलं. आरोपीला अटक करुन 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आरोपी संजय रॉयचे नियमित या रुग्णालयात येणे-जाणे सुरु होते. घटनेच्या दिवशीही घटना घडली त्यावेळी आरोपी रुग्णालयात आल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरुन निष्पन्न झाले. मध्यरात्री 2.30 वाजण्याच्या सुमारास आरोपी संजय कॉरीडोरमध्ये फिरताना सीसीटीव्हीत दिसला. रुग्णालयातील परिचारिका आणि अन्य स्टाफने त्याला ओळखले. हा व्यक्ती रुग्णांना भर्ती करण्यासाठी रुग्णालयात येत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याच्या जबाबात विरोधाभास आढळून आला. आपण रुग्णांची चौकशी करण्यासाठी येथे आल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. मात्र पोलिसांनी सदर रुग्णांची चौकशी केली असता संजय आपल्या तीन दिवसांपासून भेटलाच नसल्याचे त्यांनी सांगितले.
घटनेनंतर घटनास्थळाचा पंचनामा करताना पोलिसांना चौथ्या मजल्यावरील सेमिनार कक्षात ब्लूटुथची तुटलेली वायर सापडली. पोलिसांनी सीसीटीव्हीची फुटेज बारकाईने तपासले असता त्यांच्या लक्षात आले की, संजय रुग्णालयात आला तेव्हा त्याच्या गळ्यात ब्लूटुथ होता. मात्र तो रुग्णालयातून बाहेर पडला तेव्हा त्याच्या गळ्यात ब्लूटुथ नव्हता. पोलिसांनी चौकशी केली असता सदर तुटलेली ब्लूटुथची वायर संजयच्या ब्लूटुथचीच असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी गुन्ह्याची उकल करत आरोपीला अटक केली. सध्या आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पोलीस सखोल चौकशी करत आहेत.