जिल्हा प्रशासनाचा आदेश डावलत शिर्डी परिक्रमा; कायद्यानुसार कारवाई होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशासह राज्यात कोरोना व्हायरसचे संकट उभे ठाकले आहे. सरकारने कोरोनाचे संक्रमण राष्ट्रीय आपत्ती घोषित केली आहे. तसेच रोगाचे संक्रमण टाळण्यासाठी पावले उचलण्यात आली आहे. तसेच गर्दी टाळणे, सभा, संमेलने असे कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. असे असूनही शिर्डीत ‘ग्रीन अँड क्लीन शिर्डी’ या स्वयंसेवी संस्थेने जिल्हा प्रशासनाचा आदेश डावलत शिर्डी परिक्रमा काढली आहे. खासदार सदाशिव लोखंडे, हभप रामगिरी महाराजांसह शिर्डीतील सर्वपक्षीय कार्यकर्ते या परिक्रमेत सहभागी झाले होते. जिल्हा प्रशासनाचा आदेश डावलून ही परिक्रमा काढल्याने शिर्डी पोलीस कायद्यानुसार कारवाई करतील, असे शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी सांगितले आहे.

शिर्डीत परिक्रमा काढण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून शिर्डीतील स्वयंसेवी संस्थेने नियोजन केले होते. मात्र, कोरोनोच्या पाश्वभूमीवर राज्य सरकारच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाच्या वतीने शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी ग्रीन अँड क्लीन शिर्डीचे सचिव जितेंद्र शेळके यांना शनिवारी संध्याकाळी नोटीस बजावली होती. मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 43(1) अन्वये शिर्डी परिक्रमा महोत्सव 2020 पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्याचा आदेश दिला होता. या नोटीसनंतर शनिवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास ग्रीन अँड क्लीन शिर्डीचे अध्यक्ष अजीत पारख यांच्या सहीने आम्ही जिल्हा प्रशासनाचा आदेश मानून शिर्डी परिक्रमा स्थगित करीत असल्याचे पत्र प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना दिले होते. मात्र, रविवारी सकाळी ग्रीन अँड क्लीन शिर्डीचे सर्व सदस्य, शिर्डीतील ग्रामस्थ नियोजनाप्रमाने खंडोबा मंदीराजवळ एकत्र जमले आणि परिक्रमेत सहभागी होण्यासाठी सुमारे दीड हजार भाविक आणि शिर्डीचे ग्रामस्थही तेथे आले. साईबाबांचा रथ दाखल झाल्यानंतर या परिक्रमेला सुरुवात झाली. या परिक्रमेत खासदार सदाशिव लोखंडे ,नगराध्यक्षा अर्चना कोते ,रामगिरी महाराज ,काशिकानंद महाराज यांच्यासह शिर्डीतील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. सुमारे चौदा किलोमीटर अंतराची परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर या परिक्रमेची सांगता द्वारकामाई मंदिरात करण्यात आली.

राज्यात कोरोनोच्या रूग्णांची वाढती संख्या विचारात घेत सरकारने राज्यात महामारी प्रतिबंधक कायदा लागू करून गर्दीच्या कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. शनिवारी ग्रीन अँड क्लीन शिर्डीच्या सदस्यांना परिक्रमा महोत्सव स्थगित करण्याबाबतची नोटीस बजावली होती.रात्री उशीरा आयोजकांनी महोत्सव स्थगित करत असल्याचे पत्र प्रशासनाला दिले होते. तरीही संस्थेने प्रशासनाचा आदेश डावलून परिक्रमा काढली आहे. त्यामुळे कायद्याचा भंग झाला आहे .याबाबत शिर्डी पोलीस पुढील कारवाई करतील, असे शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी सांगितले. शिर्डी परिक्रमा रद्द करण्याबाबत प्रशासनाने आयोजकांना नोटीस बजावल्यानंतर परिक्रमा रद्द करत असल्याचे लेखी पत्र आयोजकांनी दिले. मात्र, त्यांनी ही परिक्रमा काढून आदेशाचा भंग केला आहे. त्यामुळे आयोजकांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे नगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले.