
आयुष्यावर प्रभाव टाकणाऱया एका प्रक्रियेविषयी सांगत आहे अभिनेता ज्ञानेश वाडेकर…
‘‘कधी कधी आपल्याबाबत घडलेल्या नकारात्मक घटनाही आयुष्याला सकारात्मक वळण देतात. म्हणूनच आपले ध्येय जपत पुढे चालत राहणे अधिक महत्त्वाचे ठरते.’’
माझ्या आयुष्यातली घटना असे म्हणता येणार नाही, पण माझ्याबाबत एक अशी प्रक्रिया घडली, जी माझ्या जीवनात खूप बदल करून गेली. माझ्या आयुष्यातला तो वेगळा टप्पा होता. माझे बाबा ललित साहित्य क्षेत्रातून अध्यात्माकडे वळले आणि त्यांचे ललित साहित्य बाजूला पडले. आमच्या घरात आध्यात्मिक वातावरण तयार झाले होते, जे मी लहानपणापासून बघितले. आमच्याकडे उत्सव असायचा, म्हणजे वर्षातून चार-आठ दिवस मंडप घातला जायचा. जेवणाची हजार पाने उठायची. खूप लोक याचे आमच्या घरी! आध्यात्मिक गुरू ज्यांना म्हटले जाऊ शकते, असे बाबा आमच्या घरी येऊन राहायचे. 1981 पासून साधारण 1993 पर्यंत आमच्या घरी हे सुरू होते. या लोकांचा घरात सतत राबता असायचा. माझे बाबा एका सद्गुरूंचे भक्त होते आणि त्यामुळे आपल्याला भक्तीमार्ग मिळेल, अशा काहीतरी कल्पनेत ते होते.
या 12-13 वर्षांच्या काळात आमच्या घराचा हॉल सर्व बाजूंनी मोठय़ा पह्टोंनी आणि मूर्तींनी भरलेला होता. हॉलचा एक प्रकारे दरबारच झाला होता. हे सर्व मी लहानपणापासून बघत आलो होतो. 1993 च्या आसपास म्हणजे साधारण माझ्या नववी-दहावीच्या वेळची गोष्ट असेल. घरात अचानक एक बदल सुरू झाला. त्यावेळी बाबा थोडे डिस्टर्ब दिसायला लागले. बाबांनी अचानक घरातल्या तसबिरी काढून टाकायला सुरुवात केली. त्यासंदर्भात लिहिलेले जे साहित्य होते, ते त्यांनी फाडून टाकले. पुढच्या एक-दीड महिन्यात असे झाले की, आमच्या बाबांनी ज्यांना मानले होते, त्यांचे घरातले अस्तित्व संपुष्टात यावे अशा पद्धतीने त्यांनी सर्वकाही करायला सुरुवात केली. याचे कारण असे होते की, 12-13 वर्षे माझे बाबा ज्या भक्तिभावाने त्या व्यक्तीकडे पाहात होते, ते सगळे काही फोल ठरले होते.
त्यावेळी बाबांना किंवा आमच्या घराला जो काही त्रास झाला त्याचे शब्दांत वर्णन करणे अवघड आहे. असे म्हणायला लागेल की, बाबा खरे तर त्या सगळय़ातून वाचले. आता ही जी घटना आहे ती एक-दीड महिना माझ्यासमोर घडत राहिली. बाबा त्यावेळी त्यांच्या विचारांवर ठाम राहिले. मी किंवा माझ्या मोठय़ा भावाला त्यातले फार काही ज्ञान नसल्याने आम्ही त्यात सक्रिय सहभाग काही घेऊ शकत नव्हतो. आम्ही फक्त मूक साक्षीदार होतो. काही काळाने हे सर्व निस्तरले गेले, त्यामुळे घरात थोडी प्रायव्हसी आली. आम्ही लहानपणापासून पाहात आलेला दरबार आणि नंतर एकदम सर्वसाधारण घर, असे आमच्या घराला स्वरूप आले.
बाबांचे असे वागणे किंवा हा एपंदरीत बदल मला सहज स्वीकारणे प्रचंड अवघड होते. कुठल्याही गोष्टीचा खूप बाऊ करू नये, असा माझ्या डोक्यात तेव्हा लख्ख प्रकाश पडला. कारण माझ्या वडिलांचे उदाहरण माझ्यासमोर होते. त्याक्षणी मला नक्की काय वाटले ते मी आताही नीट सांगू शकत नाही, पण या सगळय़ातून मी गेलो होतो. अर्थातच या सगळय़ाचा परिणाम माझ्यावर झाला. पण या गोष्टी अशा आहेत की, त्या कदाचित खूप नकारात्मकपणे सांगितल्या जाऊ शकतात असे वाटेल. मात्र माझ्यासाठी ती सकारात्मक घटना होती कदाचित! कारण ते जे काही सुरू होते आमच्या घरात, ते कदाचित अजून नकारात्मक मार्गावर पुढे गेले असते. यातून मी बरेच काही शिकलो. अगदी हृदयस्पर्शी नाही, पण हृदयाला तडा गेलेली घटना असे मी याबाबत म्हणू शकतो. तुमच्या आजूबाजूला, तुमच्यावर प्रभाव टाकणारे असंख्य लोक येत राहतील. पण आपले स्वतःचे जे काही ध्येय आहे त्याकडे लक्ष देत पुढे चालत राहणे अधिक महत्त्वाचे आहे.
शब्दांकन – राज चिंचणकर




























































