एफ.वाय. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड; सर्वाधिक ओढा कॉमर्सकडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर एफवायच्या प्रवेशासाठी मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची झुंबड उडाली आहे. आतापर्यंत विविध अभ्यासक्रमांसाठी चार लाखांपेक्षा जास्त अर्ज आले आहेत. यंदाही आर्ट्स आणि सायन्सपेक्षा कॉमर्सला सर्वाधिक मागणी असून फक्त बी.कॉम प्रवेशासाठी 1 लाख 11 हजार 447 विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत.

एफ.वाय. प्रवेशासाठी अर्ज विक्रीचा शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. प्रवेशासाठी 1 लाख 55 हजार 376 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्याच विद्यार्थ्यांनी विविध महाविद्यालयांमध्ये विविध अभ्यासक्रमांसाठी तब्बल 4 लाख 18 हजार 32 अर्ज भरले आहेत. बी.कॉम प्रवेशासाठी सर्वाधिक अर्ज असून त्याखालोखाल बीएमएससाठी 90 हजार 941, बीएएफसाठी 49हजार 310, बीएसाठी 29 हजार 632, बीएससीसाठी 22 हजार 872 आणि बीएसआयटीसाठी 25 हजार 949 अर्ज आले आहेत.

पदवीच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. ती नोंदणी प्रक्रिया 10 जूनपर्यंत चालणार आहे. प्रवेश अर्जाची प्रत घेऊन महाविद्यालयात सादर करण्याची मुदत 13 जूनच्या दुपारी 12 वाजेपर्यंत असून एफवायची पहिली मेरीट लिस्ट 13 जूनला सायंकाळी 5 वाजता जाहीर केली जाणार आहे.

बारावीच्या मूळ गुणपत्रिका 11 जूनला मिळणार

बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाच्या मूळ गुणपत्रिका येत्या 11 जून रोजी दुपारी 3 वाजता त्यांच्या महाविद्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.