
कोरोनाचा प्रकोप देशभरात वाढत असून गुजरातमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. गुजरातमधील सूरतची अवस्था बिकट झाली आहे. मृतांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानात रांगा लागल्या असून कब्रस्थानातही तशीच परिस्थिती आहे. सूरतमधील कोरोनाचा प्रकोप आणि मृतांची वाढती संख्या लक्षात घेता कब्रस्थानमध्ये अॅडव्हान्समध्ये म्हणजेच आधीपासूनच कबर खोदण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
कब्रस्थानात कबर खोदणाऱ्या मजूरांची कमतरता जाणवत असल्याने जेसीबीच्या मदतीने कबर खोदण्यात येत आहेत. देशभरात कोरोनाचा प्रकोप सुरू असून सूरतमध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णालयात बेड आणि व्हेंटिलेटरचीही कमतरता जाणवत आहे. रेमडेसीवीरचीही टंचाई आहे. तसेच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्याही सूरतमध्ये जास्त आहे.
या परिस्थितीमुळे सूरतमध्ये मृतांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी रांगा लागत आहेत. 10 ते 12 तास वाट पाहिल्यानंतर मृतांचे अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. स्मशानाप्रमाणे कब्रस्थानातही दफनविधीसाठी रांगा लावाव्या लागत आहेत. सूरतच्या रामपुरा येथील कब्रस्थानात दररोज 2 ते 3 मृतदेह दफनविधीसाठी आणण्यात येत होते. आता ती संख्या 10 ते 12 वर गेली आहे.
ही परिस्थिती बघून कब्रस्थानात आधीपासूनच कबर खोदण्यात येत आहे. एक कबर खोदण्यासाठी 6 ते 7 तास लागतात. त्यामुळे कबर आधीपासूनच खोदण्यात येत असल्याचे संचालकांनी सांगितले. कबर खोदण्याची कामासाठी मजूरांची कमतरता जाणवत असल्याने जेसीबीच्या मदतीने कबर खोदण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. कोरोनाच्या प्रकोपामुळे दफनविधीसाठी आणण्यात येणाऱ्या मृतदेहांची संख्या वाढल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

























































