अखेर इन्सुलिन मिळालं! केजरीवालांनी केलेल्या आरोपानंतर तिहारच्या अधिकाऱ्यांची धावपळ

आम आदमी पक्षानं (AAP) मंगळवारी सांगितलं की अखेर तिहार प्रशासनानं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना इन्सुलिन दिले आहे. ज्यामुळे आता त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी प्रमाणात राहिल.

सोमवारी, केजरीवाल यांनी तिहार अधीक्षकांचं विधान खोटं असल्याचं सांगत आरोप फेटाळून लावले होते. कारागृह अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की इन्सुलिनचा मुद्दा मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला नाही किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याचा भाग असलेल्या डॉक्टरांनीही ते सुचवले नाही. विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांच्या डॉक्टरांशी दररोज सल्लामसलत करण्याची विनंती फेटाळताना, मुख्यमंत्र्यांना इन्सुलिनची आवश्यकता आहे की नाही हे ठरवणारे एम्सच्या डॉक्टरांचे वैद्यकीय मंडळ तयार करण्याचे निर्देश तुरुंग अधिकाऱ्यांना दिले.

दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्या प्रकरणी गेल्या 22 दिवसांपासून तिहार तुरुंगात असलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे डॉक्टरांचा सल्ला घेण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी 300वर जात असल्याने त्यांना व्हीसीद्वारे डॉक्टरांचा सल्ला घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका राऊस एव्हेन्यू कोर्टात दाखल करण्यात आली होती. ही याचिका आज कोर्टाने फेटाळली.

केजरीवाल यांना मधुमेहाचा त्रास आहे, ते १ एप्रिलपासून तिहार तुरुंगात आहेत. आता रद्द करण्यात आलेल्या दिल्ली मद्य धोरणात मनी लाँड्रिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने त्यांना अटक केली होती.

अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप आम आदमी पक्षाकडून सातत्याने केला जात आहे. रविवारी दिल्ली सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी पुन्हा हा मुद्दा उपस्थित करत केंद्र सरकावर हल्ला चढवला होता.