विखेंनंतर राम शिंदेही आता ‘भावी मुख्यमंत्री’…‘त्या’ व्हायरल पोस्टची चर्चा जोरात!

नगर जिल्ह्यामध्ये भाजपतील अंतर्गत वाद टोकाला जात असतानाच राधाकृष्ण विखेंना शह देण्यासाठी पक्षातीलच अनेकांनी मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. भावी मुख्यमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे असा प्रचार त्यांचे समर्थक करत असतानाच भाजपमधील आमदार राम शिंदे यांच्या समर्थकांनी राम शिंदेच भावी मुख्यमंत्री असल्याचे दाखवत तसे फलकही लावले आहेत. त्यामुळे आता विखेंना शह देण्याची तयारी पक्षांतर्गत सुरू झाल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. तसेच राम शिंदे यांच्या समर्थकांनी लावलेल्या पोस्टर्सचीही चर्चा होत आहे.

राज्याच्या राजकारणात कार्यकर्त्यांचे प्रेम आमचा नेताच भावी मुख्यमंत्री होणार अशा भावना पोस्टर्सद्वारे व्यक्त करण्यात येतात. नेत्यांच्या वाढदिवशी अनेक नेत्यांचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर हमखास दिसतातच. सोशल मीडियावर पोस्टही व्हायरल होतात. अजित पवार, जयंत पाटील, देवेंद्र फडणवीस, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे अशा नेत्यांचे असे पोस्टर्स याआधी लागले आहेत. आता यात आणखी एका नेत्याची भर पडली आहे. भाजपचे विधान परिषेदेचे आमदार राम शिंदे यांचेही भावी मुख्यमंत्री म्हणून फलक झळकले आहेत. याची नगर जिल्ह्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे. याआधी असाच प्रकार महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याहीबाबतीत घडला होता.

आमदार राम शिंदे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून एक पोस्ट व्हायरल झाली आहे. शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून राम शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ही पोस्ट सोशल मीडियावर पोस्टही केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भावी मुख्यमंत्री याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. आगामी काळात लोकसभा तसेच राज्यातील विधानसभा निवडणुका होणार आहे. राजकीय नेतेमंडळी बरोबरच आता कार्यकर्तेही निवडणुकांच्या तयारीला लागले आहे. त्यातच काही दिवसांपासून राज्यात भावी मुख्यमंत्री म्हणून कार्यकर्ते आपल्या नेत्यांची बॅनर झळकवत आहे. नगर जिल्हयातील कार्यकर्तेही यात मागे नाहीत. रोहित पवार, राधाकृष्ण विखे यांच्यापाठोपाठ आता भाजपचे आमदार राम शिदे यांचेही भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्ट एका कार्यकर्त्याने व्हायरल केली आहे.

भाजप आमदार राम शिंदे यांचा वाढदिवस असल्याने शिंदे यांच्या उत्साही कार्यकर्त्याने थेट आपल्या नेत्याला शुभेच्छा देताना भावी मुख्यमंत्री असा उल्लेख पोस्टमध्ये केला आहे. राज्यात भावी मुख्यमंत्री म्हणून अनेक नेत्यांचे आमदार, खासदार यांचे बॅनर लागले तसेच चर्चाही झाल्या वाद विवाद झाले. आता या स्पर्धेत राम शिंदे यांची देखील एंट्री झाली. शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त देण्यात आलेल्या या शुभेच्छा पोस्टरची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.