
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मारकासाठी राज्य सरकारने एक कोटी 73 लाख 91 हजारांचा निधी मंजूर केला आहे; तसेच स्मारक उभारणीसाठी चबुतरा बांधकाम, लॅण्डस्केप, सुशोभीकरण, टॉवर बांधकामासाठी लागणाऱ्या 14 कोटी 23 लाख 92 हजार 238 रुपयांच्या अंदाजपत्रकासही मान्यता दिली आहे.
देशाच्या इतिहासात एक उत्तम प्रशासक, पराक्रमी सेनानी, न्यायप्रिय महिला, असंख्य जनकल्याणकारी कार्य करणारी लोकमाता म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवींची ओळख आहे. त्या थोर स्त्रीरत्नाचे नाव सोलापूर विद्यापीठाला प्रदान करण्यात आले आहे. विद्यापीठातील विद्यार्थ्यांसह विद्यापीठाला भेट देणाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे भव्य स्मारक उभारले जाणार आहे. स्मारक उभारणीसाठी समिती गठित केली आहे. अहिल्यादेवींच्या स्मारकासाठी चबुतरा बांधकाम, लॅण्डस्केप, सुशोभीकरण व टॉवर बांधकामासाठी अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
दरम्यान, स्मारक व टॉवर बांधकामासाठी येणाऱ्या खर्चासाठी विधिमंडळाच्या डिसेंबर 2021 मधील अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे एक कोटी 73 लाख 91 हजारांचा निधी वितरित करण्याची बाब विचाराधीन होती. त्यानुसार राज्य सरकारने निधी मंजूर केला. आता पहिल्या टप्प्यातील कामाला लवकरच प्रारंभ होईल, असा विश्वास विद्यापीठ प्रशासनाने व्यक्त केला आहे.
स्मारकासाठी दिलेला निधी प्रशासकीय मान्यतेच्या मर्यादेतच वितरित व्हावा, चालू आर्थिक वर्षात कामनिहाय तरतुदीपेक्षा अधिक खर्च करू नये, सार्वजनिक बांधकाम विभागाने तो निधी वितरित करावा, कोणत्याही परिस्थितीत संबंधित अधीक्षक अभियंत्यांच्या प्रशासकीय मान्यतेच्या रकमेपेक्षा अधिक खर्च करू नये, कार्यकारी अभियंत्यांनी कामाची प्रगती, झालेल्या खर्चाचा अहवाल विद्यापीठाचे कुलसचिव, उच्च शिक्षणचे संचालक यांना पाठवावा, ठरविलेल्या कामासाठी निधी खर्च करताना त्याला सुधारित प्रशासकीय मान्यतेची आवश्यकता लागणार नाही, मुदतीत तो निधी खर्च करावा; अनुदानाची सर्व कागदपत्रे, हिशेब तपासणीचे अधिकार राज्याचे मुंबई व नागपूर येथील महालेखापालांना देण्यात आले आहेत.

























































