
सामना ऑनलाईन। अहमदपूर
अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे आईच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने मुलाने आईला अग्नी दिलेल्या ठिकाणी स्कार्पिओ गाडीत स्वत:ला जाळून घेतल्याची भयंकर घटना घडली आहे. गजानन अण्णाराव कोंडलवाडे ( 27) असे त्याचे नाव आहे.
शिरुर ताजबंद येथील सत्यभामाबाई अण्णाराव कोंडलवाडे यांचा शुक्रवारी मृत्यू झाला त्यांच्यावर शनिवारी त्यांच्याच शेतामध्ये अंतिम संस्कार करण्यात आले. आईच्या मृत्यूचे दु:ख पचविणे गजानन यास कठीण झाले होते. रविवारी सकाळी दूध घालण्याचा कार्यक्रम झाला. परंतु आईचा विरह सहन होत नसल्याने गजानन याने रविवारी रात्री साडे अकराच्या दरम्यान स्वत :ची स्कार्पिओ गाडीत (क्रमांक एम. एच. 24.ई 5750 ) चोबळी रोडवरील शेतात जाऊन आईच्या सरणाच्या ठिकाणी गाडीसह स्वत:ला जाळून घेतले. गाडीचा सांगडा तेवढा उभा होता. गजाननच्या पश्चात वडील, भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात शोकाकुल वातावरण पसरले आहे. अहमदपूर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मित मुत्यूची नोंद झाली असून गजाननची आत्महत्या की हत्या याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. एम गित्ते करीत आहेत.































































