नगरमध्ये विजयादशमीपासून 3627 नवीन वाहने रस्त्यांवर, पुढच्या 7 दिवसांत आणखी साडेसात हजार वाहने धावणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनानंतर नगरचा वाहन बाजार दसऱयाच्या सणापासून तेजीत आला आहे. शहरासह दक्षिणेतील सात तालुक्यांत 1 ते 21 ऑक्टोबर या 21 दिवसांच्या कालावधीत 3 हजार 627 नवीन वाहने रस्त्यांवर धावली. यात सर्वाधिक 2 हजार 654 दुचाकी, तर 461 कारचा समावेश आहे. पुढच्या 7 दिवसांत आणखी 7 हजार दुचाकी व 500 चारचाकी वाहनांची विक्री होणार आहे. दरम्यान, सध्या वाहन बाजारात इलेक्ट्रिक कार वेटिंगवर आहेत.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून वाहनविक्री ठप्प झाली होती. वाहनविक्री लॉकडाऊनमुळे थांबली होती. मात्र, लॉकडाऊन कालावधीत शहरातील प्रेमदान चौक ते सह्याद्री चौक हा परिसर ऑटोमोबाइलचे हब म्हणून नावारूपाला येऊ लागला होता. कोरोना व लॉकडाऊनच्या कालावधीत नगर- मनमाड रस्त्यावरील प्रेमदान चौक ते सह्याद्री चौकादरम्यान 18 नवीन दुचाकी व चारचाकी विक्रीच्या दालनांची बांधकामे सुरू होती. ती कामे पूर्ण होऊन प्रत्यक्षात तिथे दालने सुरू झाली. नगर -पुणे रस्ता तसेच नगर- संभाजीनगर रस्त्यावरही अनेक नवीन दालने सुरू झाली. गेल्या 21 दिवसांत रेकॉर्ड ब्रेक वाहनांची विक्री झाली. 21 ते 27 ऑक्टोबर या कालावधीत 7 हजार दुचाकी, तर बुकिंग केलेली 500 चारचाकी वाहने विविध शोरूममधून ग्राहकांना सुपूर्द केली जाणार आहेत.

शनिवारी 22 ऑक्टोबर, रविवार 23 ऑक्टोबरला सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही नगरच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नवीन वाहनांची नोंदणी करून वाहनांचा ताबा दिल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी सांगितले.

पहिल्या इलेक्ट्रिक कारची डिलिव्हरी

– सहा महिन्यांपूर्वी बुकिंग केलेली व नगर शहरात दाखल झालेली पहिली ग्रँड व्हिटारा ही इलेक्ट्रिक कार उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी खरेदी केली आहे. सध्या नगरच्या वाहन बाजारात इलेक्ट्रिक कार वेटिंगवर आहेत. त्या तुलनेत इलेक्ट्रिक बाइक मुबलक प्रमाणात आहेत.

नगर उपप्रादेशिक परिवहन विभागाअंतर्गत नगर शहरासह सात तालुके येतात. शहरासह या सर्व तालुक्यांतील दुचाकी, चारचाकी व अन्य वाहनांची नोंदणी याच कार्यालयात केली जाते. उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे 1 ते 21 ऑक्टोबर या 21 दिवसांच्या कालावधीत 3 हजार 627 नवीन वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. सणासुदीमुळे या 21 दिवसांत वाहन नोंदणी वाढली आहे.

– उर्मिला पवार, आरटीओ, नगर.

सध्या सर्वच कंपन्यांच्या कारला वेटिंग असून, बुकिंग केलेल्या कार ग्राहक दिवाळीच्या मुहूर्तावर घरी घेऊन जात आहेत. नवीन बुकिंगदेखील ग्राहक करत आहेत. पुढच्या सात दिवसांत सर्व शोरूममधून 300 ते 450 कारची विक्री होईल, असा आमचा अंदाज आहे.

– हिमांशू जोशी, बिझनेस हेड, एमजी शोरूम.