मूर्तिकलेचा वारसा जपत सामाजिक कार्य! अलका दळवी घडवताहेत विलोभनीय मूर्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वडिलांकडून वंशपरंपरेने मिळालेला मूर्तिकलेचा वारसा अलका दळवी यांनी यंदाही जपला आहे. त्यांनी घेतलेल्या वशाला यंदा 24 वर्षे होत आहेत. कोरोनाकाळात माती मिळण्यास अडचणी आल्या तरी त्यांनी पर्यावरणपूरक अकरा गणेशमूर्ती तयार करत त्या आपल्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला दिल्या. याबदल्यात मिळालेली ऐच्छिक देणगी त्या विविध सामाजिक संस्थांच्या कार्याला देणार आहेत.

नगर शहरातील सावेडीच्या पाइपलाइन रस्त्यावरील एकवीरा चौकातील शिवतीर्थ बंगल्यात अलका दळवींचे गणपती दालन दरवर्षी गणेशमूर्तींनी सजते. मात्र, कोरोनामुळे यंदाही माती मिळण्यास अडचण आली. पण आपल्या या कलेत खंड पडू नये म्हणून त्यांनी मोठय़ा प्रयत्नाने माती मिळवत अकरा गणेशमूर्ती घडविल्या. यामध्ये पद्मासनातील श्रीगणेश, दगडूशेठ, फुलांवर बसलेला आणि मयूरपंखी अशा विविधांगी मनमोहक मूर्ती साकारल्या. त्या मूर्ती त्यांनी आपल्या नातेवाईकांना व मित्रपरिवाराला दिल्या.

अलकाताईंचे माहेर कोकणातील रत्नागिरी जिह्यातील राजवाडीचे. त्यांचे वडील महादेव लोटलीकर मूर्तिकलेचे अभ्यासक होते. ते हाताने शाडू मातीच्या गणेशमूर्ती करायचे. लहानपणी त्यांनाही या कलेची गोडी लागल्याने त्या आपल्या वडिलांकडून गणेशमूर्ती करायला शिकल्या. हा वारसा त्यांनी विवाहानंतरही जपला.

नगरमधील बँक अधिकारी अरविंद दळवी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यानंतर त्यांनी आपल्या घरचा गणपती स्वतः तयार केला. त्यांनी साकारलेली ही सुरेख मूर्ती पाहून नातेवाईक आणि शेजाऱयांनी पुढील वर्षी आमचा गणपती तुम्हीच करायचा असे म्हणत ही जबाबदारी त्यांच्यावर टाकली. यासाठी त्यांच्या कुटुंबानेही त्यांना प्रोत्साहन दिले.

दरवर्षी त्या किमान शंभर मूर्ती तयार करायच्या. या गणेशमूर्ती नातेवाईक, पारिवारिक मित्रमंडळी व शेजाऱयांना त्या द्यायच्या. त्यांनी दिलेली ऐच्छिक देणगी विविध सामाजिककाम करणाऱया संस्थांना मदत म्हणून देतात. यंदाही तयार केलेल्या या अकरा मूर्तींच्या मोबदल्याची ऐच्छिक रकमेमध्ये स्वतःची भर घालून स्नेहालय, सावली, अनामप्रेम, वनवासी कल्याण आश्रम या सामाजिक संस्थांना देणगी म्हणून देणार आहेत.

यंदा मूर्ती कमी तयार केल्याने अनेकजण नाराज झाले आहेत, पण कोरोनामुळे येत असलेल्या अडचणी सर्वांनाच माहिती असल्याने ‘पुढच्या वर्षीतरी आम्हाला मूर्ती नक्की द्या’, अशी प्रेमळ मागणीही अनेकांनी केली असल्याचे अलकाताई सांगतात.

असा साकारला जातो बाप्पा

अलकाताई दरवर्षी मार्च-एप्रिलमध्ये कोकणात जाऊन तेथील माती आणून ती चाळून एकजीव करून ठेवतात. त्यानंतर जूनपासून पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्ती तयार करण्यास सुरुवात होते. या मूर्ती कोरडय़ा झाल्यानंतर त्यांना नैसर्गिक रंग देतात.