उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आदरांजली

माजी पंतप्रधान, भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली आहे. देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता कायम राखत देशाला ‘महासत्ता’ बनण्याच्या वाटेवर आणण्यात स्वर्गीय इंदिराजींचं नेतृत्वं, कर्तृत्वं, त्याग, बलिदानाचं योगदान सर्वाधिक आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्याचे स्मरण करुन कृतज्ञता व्यक्त केली.

इंदिराजींच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यालढ्यात व स्वातंत्र्योत्तर जडणघडणीत इंदिराजींनी दिलेले योगदान, केलेल्या त्यागाबद्दल देशवासीय त्यांच्याबद्दल सदैव कृतज्ञ राहतील. इंदिराजींनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. तुरुंगवास भोगला. पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून देशाच्या विकासाचा पाया भक्कम केला.

आशियाई खेळांचं आयोजन असो की, अलिप्त राष्ट्रांचं नेतृत्वं करण्याची क्षमता, इंदिराजींच्या अनेक निर्णयांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचा गौरव वाढवला. देशाच्या एकता, अखंडता, सार्वभौमतेसाठी प्राणांचं बलिदान करणाऱ्या महान नेतृत्वास कृतज्ञतापूर्वक अभिवादन, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना आदरांजली वाहिली.

पोलादी पुरुष सरदार पटेलांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
देशाचे पहिले उपपंतप्रधान, पहिले गृहमंत्री, पोलादी पुरुष, भारतरत्न, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले असून राज्यातील जनतेला राष्ट्रीय एकता दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला अखंड, एकसंध, मजबूत राष्ट्र बनविण्यासाठी सरदार पटेलांनी केलेलं कार्य अलौकिक असून त्यासाठी ते सदैव स्मरणात राहतील. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अल्पावधीतच साडेपाचशेहून अधिक संस्थानांचं विलिनीकरण करुन त्यांनी अखंड, मजबूत, एकसंध देशाच्या निर्मितीचा पाया भक्कम केला.

जाती, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, बोलींची विविधता असलेल्या देशाला एकत्र आणण्याचं आणि एकसंध ठेवण्याचं फार मोठं श्रेय सरदार पटेलांच्या दूरदृष्टीला, निर्णयक्षमतेला, कणखर नेतृत्वाला आहे. सरदार पटेलांना अपेक्षित असलेल्या पुरोगामी, प्रगतशील, सर्वांना सोबत घेऊन जाणाऱ्या, सर्वधर्मसमभाव मानणाऱ्या प्रगतशील देशाची निर्मिती करणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी सरदार पटेलांना आदरांजली वाहिली.

आपली प्रतिक्रिया द्या