बहिरीचापाडा येथे शेकापला खिंडार, अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। अलिबाग

तालुक्यातील माणकुळे, बहिरीचापाडा हा परिसर विकासापासून अद्याप दूरच राहिला आहे. यास सर्वस्वी शेतकरी कामगार पक्ष कारणीभूत असल्याचे सांगत येथील शेकापच्या अनेक कट्टर कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख महेंद्र दळवी आणि तालुका प्रमुख राजा केणी यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित झालेल्या या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने या परिसरात शेकापला मोठा खिंडार पडला आहे.

या पक्षप्रवेश कार्यक्रमासाठी शिवसैनिक विजय कवळे, विभाग प्रमुख गुरुनाथ म्हात्रे, माणकुळे उपसरपंच पल्लवी पाटील, युवा सेनेचे उपविभागीय अधिकारी अनिल पटील, अलिबाग युवा सेना प्रमुख शरण म्हात्रे, अलिबाग तालुका युवा सेवा उपविभागीय अधिकारी मनोज पाटील, पोयनाड विभाग प्रमुख संकेत पाटील, हाशिवरे युवा सेना प्रमुख साहिल मोकल, शाखा प्रमुख रविंद्र पाटील आदि मान्यवरांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम उत्साहात झाला.

माणकुळे, बहिरीचापाडा गावातील आकाश पाटील, आदर्श पाटील, मंगेश पाटील, जगदीश पाटील, योगेश म्हात्रे, प्रणित पाटील, साईराज पाटील यासह अनेक शेकापचे कार्यकर्ते यांनी शिवसेनेवर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केला आहे.

बहिरीचापाडा, माणकुळे या परिसरातील भातशेती खार्‍यापाण्याने नापिक झालेली आहे. खारलॅण्डच्या अनेक योजना येऊनही त्याची योग्य अंमलबजावणी न झाल्याने ही जमीन अद्याप नापिकच राहिलेली आहे. आधी जमीनी नापिक झाल्या. त्यानंतर येथे येणार्‍या उद्योगांना शेकापने विरोध केल्यामुळे येथील नवी पिढी बेरोजगार झाली आहे. उत्पन्नाचे साधन न राहिलेल्या या नव्या पिढीचे अनेक समस्या आहेत, त्या सोडविण्याचा शिवसेनेच्या माध्यमातून प्रयत्न केला जाईल. असे यावेळी शिवसेना माजी जिल्हा प्रमुख महेंद्र दळवी यांनी आश्वासन दिले आहे.