
‘ऍमेझॉन’च्या डिलिव्हरी बॉयला पुणतांबा-श्रीरामपूर रस्त्यावर अडवून चॉपरने वार करून लुटणाऱया टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून, पाचजणांना अटक करण्यात आली आहे, तर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून 33 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वर गांगुर्डे (वय 22, रा. पिंपळवाडी, ता. राहाता), कार्तिक नारायण पांडे (वय 21, रा. सिंगपूर, ता. भदोनी, उत्तर प्रदेश; सध्या रा. शिर्डी), साईनाथ पाचारणे (वय 19, रा. राजगुरूनगर, शिर्डी), शुभम माळी (वय 19, रा. द्वारकानगर, शिर्डी), प्रशांत सोनवणे (वय 19, रा. शिंगवे रस्ता, पिंपळवाडी, ता. राहाता) अशी अटक केलेल्यांची नावे असून, दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. शुभम चोरडिया (वय 26, रा. श्रीरामपूर) याने फिर्याद दिली आहे.
शुभम चोरडिया हा 4 फेब्रुवारी रोजी पुणतांबा ते श्रीरामपूर रस्त्याने दुचाकीवरून जात असताना मागून दुचाकीवरून आलेल्या तिघांनी शुभमच्या दुचाकीला लाथ मारून त्याला खाली पाडले. त्यानंतर चॉपरने डोक्यावर मारून जखमी करून खिशातील 15 हजार रुपये रोख, 18 हजार रुपये किमतीचा सॅमसंग मोबाईल व डिलिव्हरी बॅग हिसकावून 33 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल काढून घेतला. याबाबत राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
शिर्डी रेल्वे स्टेशन परिसरात संशयितांचा शोध घेत असताना काटवनात एका झाडाखाली काही इसम बसलेले दिले. पोलिसांना पाहताच ते पळून जाऊ लागले. मात्र, पोलिसांनी सातजणांचा पाठलाग करून पकडले. एकजण पळून गेला. पकडलेल्या आरोपींनी गुह्याची कबुली दिली आहे. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी चोरीला गेलेला मोबाईल, रोख रक्कम, एक चॉपर, ‘ऍमेझॉन’ कंपनीचे डिलिव्हरी सामान असा एकूण 33 हजार 100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

























































