
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल राखीव ठेवला आहे. कोणत्याही क्षणी न्यायालयाचा निकाल लागू शकतो. न्यायालयाचा निकाल कुणाच्या बाजुने लागणार? याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. याबाबत विविध राजकीय पक्ष आणि नेते मते व्यक्त करत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही कर्नाटकमधील विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागेल, असे विधान प्रकाश आंबेडकर यांनी केले. आंबेडकरांच्या या विधानावर विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही मत व्यक्त केले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काहीही लागला तरी महाराष्ट्रात राजकीय भूकंप तर होणारच आहे, असे विधान अंबादास दानवे यांनी केले.
अंबादास दानवे म्हणाले की, कर्नाटक निवडणुकीचा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा काही संबंध असेल, असे मला वाटत नाही. सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. यावर आता लवकरात लवकर निकाल लागावा, अशी संपूर्ण महाराष्ट्राची अपेक्षा आहे. निकाल काहीही लागला तरी भूकंप तर होणारच आहे. कोणत्याही बाबी घडल्या तरी भूकंप होणार आहे. शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरणार आणि सध्याचे सरकार गडगडणार… अशाप्रकारे महाराष्ट्राचे जनमत आहे. कायदातही तेच नमूद केले आहे. तेच व्हावे, अशी आमची अपेक्षा आहे, असे ते म्हणाले.
अंबादास दानवे यांनी शरद पवार आणि अदाणी समूहाचे प्रमुख गौतम अदाणी यांच्या भेटीवरही भाष्य केलं आहे. दोन व्यक्तींची भेट झाली म्हणून एखाद्या विषयाला खीळ बसू शकत नाही. सर्व विरोधी पक्षांनी जेपीसी चौकशीची मागणी केली आहे. सगळ्यांना मान्य असेल तर जीपीसीद्वारे चौकशी करायला काहीही हरकत नाही, अशी भूमिका शरद पवारांनीही यापूर्वी मांडली आहे. त्यामुळे गौतम अदाणी यांची भेट घेतली म्हणून शरद पवारांनी आपली भूमिका बदलली, असं म्हणायचं काहीही कारण नाही.

























































