या घटनेतून सरकारचं गँगवॉर कुठपर्यंत पोहचलंय ते दिसतंय – अंबादास दानवे

कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे यांच्यामध्ये विधानभवनाच्या लॉबीमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचा मुद्दा राज्यभर गाजत आहे. त्याबाबत बोलताना विधानपरिषदेतील विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. ”या सरकारचं गँगवॉर आता विधानभवनापर्यंत येऊन पोहोचलं आहे. त्यासाठी आता या सरकारने संपूर्ण देशाची माफी मागावी, अशी मागणी दानवे यांनी केली आहे.

”दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्यात लॉबीत गुद्दागुद्दी झाली. मारामारीपर्यंत ते आले. या सगळ्या गोष्टीची माहिती आम्ही सभापतींकडे मागितली होती. विधानभवन लोकशाहीचं मंदिर आहे. त्याचं पावित्र्य सर्वांनी जपलं पाहिजे. इथे एकाच गँगमध्ये असलेले सत्ताधारीच एकमेंकांना भिडत आहेत. यावरून या सरकारचं गँगवॉर कुठपर्यंत पोहचलंय ते दिसतंय. महाराष्ट्रात गँगवॉर, गुंडाराज आहे ते यांनी सिद्ध केलं. याबाबत सरकारने स्पष्टीकरण द्यावं, असे अंबादास दानवे म्हणाले.

”महाराष्ट्रातील लोकशाहीचं हे जे पवित्र मंदिर आहे. इथून महाराष्ट्रातल्या कोट्यवधी जनतेच्या भल्याचे निर्णय घेतले जातात. अशा पवित्र ठिकाणी सत्ताधारी पक्षातील आमदारांनी गुद्दागुद्दी केली आहे. त्यामुळे त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. अशा प्रकारची आमची भूमिका आहे. इथे मंत्र्याचा आवाज जरी वाढला असेल तरी तो का वाढला याचा विचार झाला पाहिजे. सत्ताधारी पक्षाचे नेते एकमेकांना दररोज भेटतच असतील असे असताना विधानभवनाच्या लॉबीत असे करण्याचे गरज नव्हती. यावरून कळतंय की या लोकांना जनतेशी लोकशाहीशी काही घेणं देणं नाही”, असे अंबादास दानवे म्हणाले.

”’महाराष्ट्रात कोणचे किती किस्से सांगायचे. रोज सांगून आम्ही देखील थकलो. या सत्ताधारी पक्षांमध्ये गणेशोत्सवात गोळीबार करणारे आमदार आहेत, पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करणारे आमदार आहेत. अधिकाऱ्याला मारहाण करणारे आमदार आहेत. महिलांना शिव्या देणारे आमदार आहेत. आमचा बाप सागर बंगल्यावर बसलाय असे आमदार आहेत, पोलीस पत्नींचा अवमान करणारे आमदार आहेत. विधानभवनात धक्काबुक्की करणारे आमदार आहेत. जनाची नाही तर मनाची तर वाटू द्या जराशी, अशी टीका अंबादासन दानवे यांनी केली आहे.

”व्हेलमध्ये उतरून हमरी-तुमरी वर येणाऱ्या सत्ताधारी पक्षांचा वाद हा ‘वाद’ आहे असे सरकार कसे काय मानेल? कारण बंदुका निघाल्या आणि गोळ्या झाडल्या तरीही त्या ‘प्रेमापोटी’ झाडल्या, असे हे सरकार म्हणायला बसले आहे. थोडे थांबा, खोके गॅंगचे सदस्य एकमेकांचे केस उपटताना दिसले तर आश्चर्य वाटायला नको”, असे ट्विट देखील दानवे यांनी केले आहे.