
त्रिपुरा येथील मशीद तोडफोडीच्या निषेधार्थ शुक्रवारी अमरावती शहरात आयोजित करण्यात आलेल्या मुस्लिमांच्या मोर्चाला हिंसक वळण लागले आहे. शुक्रवारी दुपारी मुस्लीम बहुल असलेल्या नागपुरीगेट परिसरातून दुचाकीवर मुस्लिमांचा मोर्चा निघाला. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला होता. या दरम्यान मोर्चेकरांनी अनेक दुकानांची तोडफोड केली आहे. यासोबतच लुटमारसुद्धा केल्याचे वृत्त आहे.
मोर्चेकऱ्यांनी चित्राचौकात असलेल्या गुप्ता किराणा, गांधी फूड कोर्ट, गुप्ता यांचा तेलघाणा, जयस्तंभ चौकातील राजरसिक सह इतरही मोठ्या प्रतिष्ठांनावर दगडफेक करण्यात आली. यासोबतच इर्विन चौकातील राहुल ट्रॅव्हल्स, सूरज कॅफे तसेच साऊथ किचनचे सुद्धा नुकसान केले आहे. गर्दीच्या वालकट कंपाउंडमध्ये सुद्धा दगडफेक व लुटमारीचे प्रकार घडले आहे.
शुक्रवारी दुपारी मुस्लिमांच्या शिष्टमंडळाने दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मुस्लीमबहुल असलेल्या खोलापुरी गेट, नागपुरी गेट, चित्राचौक परिसरात आज सकाळपासूनच दुकाने बंद होती. मुस्लिमांचा हा मोर्चा शांतता मार्गाने निघेल असे वाटत असताना मात्र मोर्चेकरांनी ठिकठिकाणी दगडफेक केल्यामुळे या मोर्चाला हिंसक वळण लागले. याबाबत वेगवेगळया पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

























































